
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी वाघेरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने शिवसेनेत सामील झालेल्या पाठीराख्यांना आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. संजोग वाघेरे आणि संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भावूक या शब्दाचा उल्लेख केला होता. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की भावूक आणि घाऊक यातील फरक कळायला लागला आहे. ‘जे भावूक आहे,ज्यांच्यात संवेदना आहेत ते सर्व निष्ठेने भगव्यासोबत आहेत. आणि जे घाऊक आहेत ते कोण आहेत ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, तुम्हाला ते माहिती आहेत.’ असे ठाकरे यांनी म्हटले.
जिथे सत्ता असते तिथे गर्दीचा ओघ असतो. मात्र इथे उलटं आहे. इथे सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीने तुम्ही इथे आला आहात. जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच गद्दारी गाडायची सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी कामाला लागा असे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हटले. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानताना म्हटले की उद्धव ठाकरे हे मितभाषी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. सगळ्यांच्या वतीने मी आपले ऋण व्यक्त करतो आणि आपण द्याल ती जबाबदारी मी पार पाडेन. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटले की, मावळ शिवसेनेकडे खेचून आणण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे. 2023 मावळताना शिवसेनेचा सुर्य तेजाने इथे उगवलेला दिसत आहे.संघर्षाच्या काळात आमच्यासोबत उभे राहिल्याबद्दल आभार मानतो.
त्यांच्या वजनाने बाबरी पडली असेल तर माहिती नाही
बाबरी पडली तेव्हा तिथे शिवसैनिक नव्हतेच असे विधान करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘ते चढले असतील आणि त्यांच्या वजनाने पडला असेल तर माहिती नाही. फडणवीसांच्या अशा विधानातून जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय. शिवसेनाप्रमुख, शिवसेनेच्या योगदानाबद्दल हे असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे ते लोकांना कळत आहे. त्यामुळे तुम्हीच तुमच्या ढोंगीपणाचा बुरखा उतरवलात याबद्दल फडणवीसांना मी धन्यवाद देतो. ‘
आपल्याला राम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले नाही. अयोध्येत राम मंदिर होणे ही आनंदाची बाब आहे. शिवसेनेने मंदिरासाठी मोठा लढा दिला आहे. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्याने हिसकावून घेण्यात आला होता. अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला आहे, रक्त सांडले आहे. त्यामुळे कोणी का करत असले तरी राम मंदिर होत असल्याचा मला आनंद आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप सुरळितपणे होईल माझ्याकडून आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची एकत्र बैठक करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.



























































