
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे वर्ग वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत प्रवेशप्रक्रियेनुसार सुरू आहेत. दुसऱया वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या त्रिसदस्यीय समितीकडून मेडिकल कॉलेजसह जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली असून, आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग याच महिन्यात पाहणी करणार आहे. त्यानंतर दुसऱया वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.
14 फेब्रुवारीपासून सातारा मेडिकल कॉलेजचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयाच्या महिला कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’ची पहिल्या वर्षाची बॅच सुरू आहे. पहिल्या वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 85 विद्यार्थी व इतर राज्यांतील 15 विद्यार्थी आहेत. या वर्षी जुलै महिन्याच्या अखेर किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला मेडिकल कॉलेजच्या दुसऱया वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या समितीने मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला पाठविण्यात आला.
आयोगाची त्रिसदस्यीय टीम याच महिन्यात मेडिकल कॉलेजची पाहणी करणार आहे. यात लेक्चर हॉल, स्टाफ, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया सुविधा, बांधकाम व्यवस्था, द्वितीय वर्षातील सुविधा, वर्ग नियमित सुरू आहेत का? याची पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयाचीही पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱया वर्षाच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. रवींद्रनाथ चव्हाण यांनी सांगितले.

























































