कास पुष्प पठारावरील फुलांचा यंदाचा हंगाम समाप्तीकडे, ऑनलाइन बुकिंग बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान बदलाचा कासच्या फुलांना फटका बसत आहे. या वर्षीचा पुष्प हंगाम समाप्तीकडे झुकला आहे. कास पठार कार्यकारी समितीकडून गुरुवारपासून दि. 20 रोजी ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात येणार आहे. तरीही प्रत्यक्ष पठारावर तिकीट घेऊन पर्यटकांना अजूनही पंधरा ते वीस दिवस फुलांचा आनंद घेता येईल. पठारावर तिसऱ्या टप्प्यात येणारी मिकी माऊस व सोनकीची पिवळी धमक छटा अद्यापही पाहण्यास मिळत आहे.

पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारा कास पठारावरील नैसर्गिक रंगीबिरंगी फुलांचा हंगाम 10 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला केला होता. राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र, पठारावर सर्वांत जास्त आणि प्रमुख आकर्षित ठरणारी गुलाबी तेरडा जातीची फुले अतिपावसामुळे कमी प्रमाणात उमलल्याने पर्यटकांची नाराजी पाहावयास मिळाली. परंतु पांढरा गेंद, निळी जांभळी, सितेची आसव, कापरू, पिवळा मिकी माऊस व कुमुदिनी तळ्यातील कमळेही जास्त प्रमाणात बहरल्याने पर्यटकांची खास आकर्षण ठरत होती. पठारावर पांढरा गेंद, पिवळी मिकी माऊस व अन्य जातीची फुले आहेत. मात्र, गवत जास्त प्रमाणात वाढल्याने ती कमी प्रमाणात दिसत आहेत.

वर्दळीच्या भागात फुले कमी

कास पठारावर यावर्षी फुले नसल्याची ओरड पाहायला मिळाली. वास्तविक ज्या भागात मानवी हस्तक्षेप कमी, स्थानिकांच्या जनावरांचा वावर आहे, अशा पठारावरून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या राजमार्गावर चांगली फुले पाहावयास मिळतात. कुमुदिनी तलावाकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा फुलांचे गालिचे दिसत होते. मात्र, येणाऱ्या पर्यटकांपैकी 50 टक्के पर्यटकच या भागात जातात. बाकीचे नेहमीच्या गेट क्रमांक एक व दोनमध्येच फुले पाहण्यासाठी जातात. त्यांना फुलांचा आनंद घेता येत नाही. नेहमीच्या वर्दळीच्या भागातील फुले कमी झाली आहेत, हे नक्की.