
थकीत कराच्या पोटी सातारा नगरपालिकेच्या वसुली पथकाने वायसी कॉलेज येथील रोहन हाईट्स या व्यावसायिक इमारतींमधील चार गाळ्यांना सिल ठोकले. हे गाळे माजी नगरसेवक ऍड. विलास आंबेकर यांच्याशी संबंधित असल्याची माहिती नगरपालिकेतून दिली.
नगरपालिकेस मिळकतधारकांकडून मोठय़ा प्रमाणात करांची येणे बाकी असून, त्याच्या वसुलीसाठीचे प्रयत्न नगरपालिकेकडून सुरू आहेत. थकीत करांची वसुली करण्याबरोबरच वारंवार मागणी करूनही कर न भरणाऱयांच्या मिळकती जप्त करण्याचे सत्र नगरपालिकेने सुरू केले आहे. यानुसार नगरपालिकेच्या पथकाने वायसी कॉलेज परिसरातील एका व्यावसायिक इमारतीतील चार गाळ्यांना सिल ठोकले. या मिळकतींच्या वापरापोटी नगरपालिकेस 19 लाख 3 हजार 412 रुपयांचा कर येणे बाकी आहे. वारंवार मागणी करूनही करभरणा न केल्याने नगरपालिकेने ही कारवाई केली. ही मिळकत ऍड. विलास आंबेकर यांच्याशी संबंधित आहे.
दरम्यान, पालिकेने केलेली कारवाई चुकीची असून, दाखविलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारची मिळकत नाही. या अनुषंगाने न्यायालयीन वाद सुरू आहे. अधिकारांचा गैरवापर करत ही कारवाई करण्यात आली असून, त्याविरोधात फौजदारी कारवाई करणार असल्याची माहिती ऍड. विलास आंबेकर यांनी दिली.




























































