नाशिक पदवीधरसाठी कॉँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी झालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सत्यजीत तांबे यांना कॉँग्रेसकडून पाठिंबा जाहीर केला. त्यापाठोपाठ भाजप नेते, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सत्यजित यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. यामुळे सत्यजीत नेमके कुणाचे? असा संभ्रम कॉँग्रेस-भाजपमध्ये निर्माण झाला आहे.
नाशिक पदवीधरसाठी सत्यजीत तांबे अर्ज भरणार याबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र ते काँग्रेसकडून भरणार की भाजपकडून भरणार याबद्दल सस्पेन्स होता. अखेर त्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मुळात या मतदारसंघात तांबे यांनी आधीपासूनच नेटवर्क उभारलेले आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने निवडणुकीचे गणित सोपे आहे. मात्र यामुळे काँग्रेसची मोठी नामुष्की झाली आहे. अर्थात निर्णय घेण्यास आणि कृती करण्यास मोठा विलंब केल्याची किंमत यानिमित्ताने काँग्रेसला मोजावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने खेचून आणला होता. डॉ. तांबे यांनी सलग तीन वेळा तेथून विजय मिळविला. यावेळीही भाजपसाठी ही निवडणूक अवघड मानली जात होती. शेवटी भाजपने अशी खेळी करून या मतदारसंघावर दावा करता येईल, अशी वेळ आणून ठेवली आहे.
– कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजित यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला होता, पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे थोरात यांनीच सत्यजित यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास लावून ते भाजपच्या गळाला लागणार नाही याची खबरदारी घेत राजकीय डाव टाकल्याचे बोलले जात आहे. तांबे आणि थोरात एकमेकांचे नातेवाईक असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्याच सारे काही अलबेल नसल्याची चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली आहे.
– सत्यजीत यांच्यावर भाजपची नजर आहे, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभराआधीच बोलून दाखविले होते. तरीही कॉँग्रेसने यातून काहीच बोध घेतला नाही. सत्यजित हे आपण काँग्रेसचेच असल्याचे सांगत असले तरी भाजपकडून त्यांना बिनविरोध निवडून आणून शह-काटशहाच्या राजकारणात एक हुकमी एक्का हाती ठेवण्याची फडणवीसांची खेळी यामागे असल्याची चर्चा आहे.



























































