
अवाजवी व्याजाचे कर्ज देऊन वारंवार व्याज व मुद्दलासाठी तगादे लावल्याने गुजरातमधील एक कंत्राटदार सर्वसंग परित्याग करून संन्यासी झाल्याचे समोर आले आहे. गांधीनगर येथील माजी क्लासवन ऑफिसरचा मुलगा असलेला लेबर कॉन्ट्रक्टर तब्बल सहा सावकारांच्या छळवादामुळे घरातून गायब होऊन गिरनार पर्वतावर संन्यासी होऊन फिरत असल्याचे उघडकीस आले आहे.
पार्थ चुडासामा असे 36 वर्षीय लेबर कॉन्ट्रक्टरचे नाव असून, त्याने सावकारांकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र, सहा सावकारांनी व्याजावर व्याज लावत हा आकडा 3 वर्षांत 70 लाखांवर नेला. सेक्टर 3 गांधीनगर येथे राहणारा चुडासामा सावकारांच्या तगाद्यामुळे एक महिन्यापूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या पुतण्याने त्याला गिरनार येथे संन्सासी होऊन भटकताना पाहिले.
मार्च 2017 मध्ये पार्थ चुडासामा निवडणुकीबाबतची सरकारी कामे करीत होता. त्याला मजुरांचे पैसे देण्यासाठी तातडीने दोन लाख रुपये हवे होते. राजू देसाई नावाच्या सावकाराकडून त्याने दोन 2 टक्के मासिक दराने चार महिन्यांसाठी 2 लाख रुपये कर्ज घेतले. या बदल्यात चुडासामा याने दोन कोरे धनादेश राजू देसाई याला दिले.
चार महिन्यांनंतर चुडासामा पैसे पर करण्यासाठी देसाईला भेटला. व्याजासह चुडासामा याने 2.70 लाख रुपये देऊ केले. मात्र, त्याने पैसे घेण्यास नकार दिला. मासिक 10 टक्के व्याजाने पैसे दिल्याचा दावा देसाई याने केला. कोरे धनादेश रक्कम लिहून बँकेत टाकीन आणि तुला चेक बाऊन्स केसमध्ये अडकवीन, असा दम दिला.
चुडासामा पैशांची तजवीज करीत असताना देसाईचे कर्ज 7.50 लाखांवर गेले. स्वतःकडील 5.50 लाख आणि नवभारवाड या दुसऱया सावकाराकडून 10 टक्के मासिकदराने घेतलेले दोन लाख असे 7.50 लाख देसाई याला देण्यास चुडासामा गेला. तेव्हा देसाई याने तुझे देणे 12.50 लाख असल्याचे सांगितले.
तीन सावकारांकडून घेतलेली मुद्दल व त्यावरील व्याज यासाठी चुडासामा याने प्रकाश देसाई या चौथ्या सावकाराकडून 4.50 लाख आणि रजनीकांत पटेल या पाचव्या सावकाराकडून 13.50 लाख रुपये चुडासामा याने घेतले.
यानंतर एका मित्राने चुडासामा याला ब्रिजेशसिंग परमार या सहाव्या सावकाराची ओळख करून दिली. त्याच्याकडून 10 लाख रुपये चुडासामा याने घेतले. आतापर्यत 20 लाख रुपये फेडल्यावरही चुडासामा याच्यावर 70 लाखांचे कर्ज होते. 25 ऑक्टोबर रोजी चुडासामा याने घर सोडले. दिल्लीला जाऊन आठवडाभर फूटपाथवर राहिला. दिल्लीतून अनेक वाहने बदलत बदलत तो गिरनार पर्वतावर पोहोचला. तेथे दोन साधूंसोबत तो दोन आठवडे राहिला. 6 नोव्हेंबर रोजी पुतण्याची गिरनार येथे भेट झाल्यावर चुडासामा तळमळून रडला आणि त्याने छळवणुकीची कहाणी कथन केली.

























































