
सामना प्रतिनिधी । उरण
संततधार पडणाऱ्या मुसळधार पावसाने उरण तालुक्याला झोडपून काढले आहे.अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून जनजीवन विस्कळित झाले आहे.तर पडणाऱ्या पावसात केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे कौलारू छत कोसळल्याची घटना घडली आहे.कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नसली तरी विद्यार्थी,पालक वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने जुलै महिना उजाडताच उरण तालुक्यात दमदार सुरुवात केल्यानेे शेतकरी सुखावला असुन नांगरणी,भात लावणीच्या कामांत गर्क झाला आहे.पावसाने आपली रिपरिप अशीच सुरूच ठेवल्याने काही भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे.तसेच सखल भागात, रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागला.
शनिवारी सकाळी उरण तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शाळा, काँलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे, नोकरदार वर्गाचे हाल झाले. संततधार पडणाऱ्या पावसामुळे नागरीकांनी घराबाहेर पडण्याचे यावेळी टाळले. एकंदरीत उरण तालुक्यात दमदार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सतत पडणाऱ्या पावसामुळे केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे कौलारू छप्पर पडल्याने विद्यार्थी, पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
































































