बलात्काराचा आरोप सहन झाला नाही, वृद्ध दांपत्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । इंदुर

मध्यप्रदेशातील इंदुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप सहन न झाल्याने एका ज्येष्ठ नागरीकासह त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. चंद्रशेखर भिडे (61) आणि वंदना भिडे (60) अशी या दोघांची नावं असून त्यांनी एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली.

इंदुरच्या बिमानगर परिसरात राहणारे भिडे दांपत्य पाळणाघर चालवत होते. काही दिवसांपूर्वी एका महिलेने भिडे यांच्याविरोधात तिच्या 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच ती वेळोवेळी या दांपत्याला धमकावत देखील होती. तेव्हापासून हे दांपत्य बेपत्ता झाले होते. बुधवारी रात्री उशीरा त्यांचे मृतदेह बडवानी येथील आनंद पॅलेस हॉटेलमध्ये आढळले. भिडे दांपत्य 20 जानेवारीपासून या हॉटेलमध्ये राहत होते. मात्र बुधवारी सकाळपासून त्यांनी खोलीचा दरावाजा उघडला नव्हता. त्यांच्या खोलीत इंजेक्शनची सिरिंज, किटकनाशक तसेच इंसुलीनची बाटली आढळली आहे. त्यामुळे त्यांनी विषारी किटकनाशक टोचून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भिडे दांपत्याच्या आत्महत्येची बातमी त्यांच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी पलसीया पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. वृद्ध दांपत्यावर खोटे आरोप केल्यानेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच आरोप करणाऱ्या महिलेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.