
कोरोनाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला असून शेअर बाजारही सतत कोसळत आहे. त्यानंतर आता डॉलरच्या तुलनेत रुपयाही चांगलाच आपटला आहे. गुरुवारी इतिहासात प्रथमच रुपयाची मोठी घसरण होऊन तो 75 रुपये प्रतिडॉलर्सवर पोहोचला. कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांमुळे करन्सी मार्केटमध्येही चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी रुपयाची किंमत 70 पैशांनी घसरून तो 74.96 च्या स्तरावर उघडला. बुधवारी अखेरच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 74.26 वर बंद झाला होता. दोन महिन्यांत रुपयामध्ये मोठी घसरण झाली. तसेच शेअर बाजारातही कोरोनाच्या भीतीचे सावट दिसून आले. गुरुवारी सकाळी शेअर बाजाराला सुरुवात होताच निर्देशांक दोन अंकांनी घसरला. शेअर बाजार 27,099.32 अंकावर सुरू झाला त्यानंतर काही वेळातच 2045-75 अंकांनी कोसळला. तर निफ्टीमध्येही 442 अंकांनी घसरण झाली.
























































