
शैक्षणिक वर्ष 2021-22 ची संच मान्यता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाआधारेच करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. राज्यात सध्या 87 टक्के विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढण्यात आले असून 100 टक्के विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढण्याची प्रक्रिया येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी. तसेच संच मान्यतेसाठी सरल प्रणालीवर आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थीच ग्राह्य धरण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदविण्यास उशीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आधार क्रमांक न काढलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार डिसेंबर 2021 रोजी शाळेच्या पटावर नोंद असलेले मात्र सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे 31 मार्चपर्यंत आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावेत. तसेच डुप्लिकेट आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा शाळास्तरावर दुरुस्त करण्यात यावा. डुप्लिकेट आधार क्रमांक अस्तित्वात राहणार नाहीत याची खात्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पटावर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांआधारे संच मान्यता
नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करून सदर विद्यार्थी संच मान्यतेकरिता ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
विद्यार्थी एकाच शाळेत हजर आहे का याची तपासणी होणार
आधार क्रमांकासाठी नोंदणी केलेले, परंतु अद्याप आधार क्रमांक न मिळालेले विद्यार्थी एकाच शाळेत नियमित उपस्थित आहेत का, सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्येही दाखविण्यात आले आहेत का याची शहानिशा करण्यासाठी पडताळणी समितीमार्फत शाळांची पडताळणी करण्यात येणार आहे. शिक्षण विस्तार अधिकारी या समितीचे प्रमुख असणार आहेत.


























































