शहाडच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट; दोन ठार, दोघे बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृत्रिम धाग्याची निर्मिती करणाऱया शहाडमधील प्रसिद्ध सेंच्युरी रेयॉन कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. त्यात दोन कामगार जागीच ठार झाले असून दोघे बेपत्ता आहेत, तर या दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. कंटेनरमध्ये कार्बनडाय सल्फर भरण्यापूर्वी तपासणीचे काम सुरू असतानाच हा धमाका झाला. स्फोट एवढा भीषण होता की एक किलोमीटरचा परिसर हादरला असून रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे सेंच्युरी रेयॉन कंपनीतील शेकडो कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या स्फोटाची चौकशी होणार असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विविध कामगार संघटनांनी केली आहे.

रेयॉन क्षेत्रात शहाडची सेंच्युरी रेयॉन ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून सुमारे साडेचार हजार कामगार काम करतात. या कंपनीत तीन शिफ्टमध्ये रेयॉन निर्मितीचे काम चालते. येथील रेयॉन निर्यातदेखील केला जातो. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास नायट्रोजन गॅस कंटेनर सीएस 2 या डिपार्टमेंटमध्ये आला होता. या कंटेनरमध्ये कार्बनडाय सल्फर हे रसायन भरण्यात येणार होते. त्यासाठी नेहमीप्रमाणे कंटेनरची तपासणी सुरू असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये शैलेश यादव (26) व राजेश श्रीवास्तव हे दोन कामगार ठार झाले आहेत, तर पवन यादव व अनंत डोंगरे हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

स्फोटाचे वृत्त समजताच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी आदींनी घटनास्थळी भेट दिली.

नुकसानभरपाई व वारसांना नोकरी
दुर्घटनेत मृत कामगारांच्या वारसांना नुकसानभरपाई दिली जाणार असून कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्यात येणार आहे. सेंचुरी रेयॉन येथील स्फोटांमुळे शहाड गावठाण, तानाजी नगर, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर परिसरातील घरांना प्रचंड हादरे बसले.