भाजपबरोबर न जाण्यासाठीच शरद पवारांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule-sharad-pawar

काही लोकांना भाजपसोबत जायचं आहे, हे लक्षात आल्यामुळे शरद पवारांनी नाराज होऊन पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. एकीकडे अजितदादांच्या गटातील लोक म्हणतात, ‘‘पवारसाहेब हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवतात. पण जेव्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, तेव्हा शरद पवार यांनी कमिटी नेमली. मग ही हुकूमशाही कशी होऊ शकते? या वेळी उलट छगन भुजबळांनी आग्रह केला होता की, कमिटी वगैरे नको. तुम्हीच अध्यक्ष राहा, राजीनामा मागे घ्या. त्यामुळे शरद पवार यांच्यावर केले जाणारे मुद्दे कसे खोटे आहेत हे यांच्या वक्तव्यातून दिसून येते,’’ असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.

जेक्हा शरद पवारांनी राजीनामा दिला, तेव्हा सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचं ठरलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती तसं ठरलं होतं, असा खुलासा  छगन भुजबळ यांनी नुकताच केला. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांचे मत खोडून काढले. शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता; पण या लोकांना भाजपसोबत जायचं आहे, हे लक्षात आल्यामुळे नाराज होऊन त्यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. पण मी अध्यक्ष झाल्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय करणार होते, असे भुजबळ म्हणत आहेत. पण ते मी कदापि केलं नसतं. त्यामुळे ते जे काही बोलत आहेत ते खरं नाही. मी रोज एक डायरी लिहिते. दिवसभर ज्या गोष्टी होतात त्या मी डायरीत लिहिते. त्यामुळे मी कालच्या मुलाखतीतील प्रत्येक गोष्ट लिहून आणली. भुजबळ कोणत्या मीटिंगबद्दल बोलले? त्यामागचे संदर्भ काय? या सर्क गोष्टी मी डायरीत पडताळून पाहिल्या. मी थिअरी म्हणून लिहीत नाही, तर सवय म्हणून लिहिते. त्यामुळे 2 जुलैच्या शपथविधीच्या रात्री काय घडलं हे मी सांगू शकते, असेही त्यांनी सांगितले.