
- शशिकांत सावंत
पुस्तकांचं जग खरोखरच अद्भुत असतं. इथे पुस्तक, लेखक आणि वाचक यांचे वेगळे अनुबंध जुळलेले असतात. पुस्तकांच्या कथा, दंतकथांनी हे जग अधिकाधिक फलत राहतं, विस्तारत राहतं. अशाच पुस्तकांविषयीचं कृतज्ञ प्रेम, पुस्तकाविषयीच्या आठवणींचा गोतावळा हे सारं काही मांडणारा लेख.
चांगला ग्रंथसंग्रह असणाऱ्यांची आणि चांगलं वाचन करणाऱ्यांची एक प्रतिमा समाजात तयार होते. त्यांच्याकडे दोन प्रकारे पाहिलं जातं. एकतर अतीव आदराने की, असे वाचणारे व्यासंग करणारे लोक म्हणजे आमच्यापेक्षा वेगळे असं म्हणून…तर दुसरीकडे पैसा आणि वेळेचा केवढा अपव्यय करणारी माणसं याही दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं.
विशेषतः नातेवाईकांकडून आणि घरच्यांकडून संग्राहकांकडे यादृष्टीने पाहिलं जातं. अशोक राणे किंवा जयंत पवार यांसारखे, आम्ही थोडेसे पहिल्या पिढीतील शिकलेले जे लोक आहेत, त्या मंडळींना हा अनुभव नेहमी येतो. उलट राजी श्रीखंडेसारख्या वाचक मित्राची गोष्टच वेगळी. कारण घरात आई-वडील, पत्नी, मुलगी…सगळ्यांना वाचनाची आवड आहे.
हजार, दोन हजार पुस्तकं जमा होणाऱ्या किंवा पाच-दहा हजार पुस्तकं असलेल्या माझ्यासारख्या माणसाला लोक नेहमी प्रश्न विचारतात, यातील तुम्ही किती वाचली आहेत? खरंच, सगळी पुस्तकं कोणी वाचलेली असतात का, असा त्यांना प्रश्न पडतो. उंबेर्तो इको या तत्त्वज्ञ लेखकाकडे 25 हजार पुस्तकांचा संग्रह होता. त्यालाही लोक हा प्रश्न विचारत. गमतीने तो म्हणत असे की, ती तुम्हाला खाली दिसतात ती वाचून संपलेली आहेत आणि टेबलावरची पुस्तकं या आठवडय़ात वाचायची आहेत, पण ही झाली गंमत. खरी गोष्ट अशी की, आपण डिक्शनरी काही रोज वाचत बसत नाही. ती कामाच्या वेळी आपण उघडतो. तशी अनेक संदर्भ पुस्तकं कामाला लागतील म्हणून घ्यायची असतात आणि स्वतःचे ग्रंथालय हे एक शब्दकोशाप्रमाणे ‘वार्ंकग टूल’ आहे. बहुतेक पुस्तक संग्रह करणाऱ्यांकडे त्यामुळेच त्यांनी वाचलेल्या पुस्तकांपेक्षा चौपट-पाचपट पुस्तकांचा ढिगारा जमतो.
मी पुस्तक संग्रह करताना मराठीतल्या अनेक चांगल्या वाचकांकडून क्ल्यू घेतले म्हणजे इक्बाल मसूद, शामलालपासून ते मराठीतील व्यंकटेश माडगूळकर, मे. पु. रेगे अशा मंडळींचे वाचनावरचे लेख वाचत गेलो. त्यामुळे मला अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची नावे कळली. ‘नवी क्षितिजे’चे संपादक विश्वास पाटील यांनी मला अनेक चांगल्या पुस्तकांबद्दल सांगितलं. तत्त्वज्ञान कसं क्रमाने वाचत आहे सांगितलं. त्यांचं सगळंच मी ऐकलं असं नाही. दुर्गाबाई त्यांना आपले मानसपुत्र मानत. पाटील संपादित करत असलेल्या ‘नवी क्षितिजे’मध्ये दुर्गाबाई नियमित लिहीत. मिरसा इलियाडसारखा लेखक दुर्गाबाई आणि पाटील दोघे निगुतीने वाचत. मानववंशशास्त्रज्ञ क्लॉड लेव्ही स्ट्रॉसदेखील. आपणही सर्व माहितीसमृद्ध होत जातो आणि ती पुस्तकं जमवायला लागतो, पण प्रत्यक्षात लक्षात येतं की, ही जी वैचारिक पुस्तकं असतात ती कथा, कादंबऱ्यांपेक्षा प्रचंड महाग असतात.
उदाहरणार्थ, ‘पोएटिक्स ऑफ दोस्तोव्हस्की’ हा गाजलेला ग्रंथ लोटसच्या दुकानात होता. त्याची किंमत होती 1800. पगारच महिन्याला दोन हजार होता. पुस्तकाचा छंदच असा महागडा छंद आहे.
पुस्तक संग्राहकांना येणारे काही नेहमीचे अनुभव म्हणजे ‘‘आम्हाला काहीतरी वाचायला द्या’’ म्हणणारे एक पुस्तक देऊन गायब होणारे वाचक, पण खरी गंमत अशी असते की, त्यांनी पुस्तक वाचलेले नसते. अनेकांना समोर दिसलं आणि मोफत मिळू शकेल अशा स्थितीत असले तर कुठलेही पुस्तक हवं होतं. म्हणूनच माडगूळकर सांगतात की, कधी दिवाणखान्यात पुस्तक ठेवू नये. पुस्तकांची जागा म्हणजे बेडरूम. कारण तिथे बाहेरची माणसं येत नाहीत. मी पाहिलेला पहिला मोठा ग्रंथसंग्रह होता तो य. दि. फडके यांचा. त्यांचा मुलगा अनिरुद्ध माझ्या वर्गात होता आणि बाई मला शिकवायला होत्या म्हणून मी कधी मध्ये त्यांच्या घरी जात असे. आतापर्यंत सर्व खोल्यांतून पुस्तकंच पुस्तकं व्यापली होती. वाचन शिस्तीने करणारे अनेक लोक मला माहीत आहेत. अनेक जण पुस्तकावर खुणा करत वाचतात. जसे की, विश्वास पाटील वाचायचे, गोविंद तळवलकरही.
काही माणसांना खुणा करायला आवडत नाही. मग ते एखादा ठिपका देतात. य.दि. फडके त्याप्रकारे ठिपका द्यायचे. भालचंद्र नेमाडेंनाही ही सवय आहे. अलीकडे डॉ. अशोक मोडक यांची भेट झाली. त्यांना काही पुस्तकं हवी होती. ती मी घेऊन गेलो होतो. विशेषतः bharat karnad यांची गाजलेली दोन्ही पुस्तकं मी त्यांना दिली. त्यामुळे ते खूश होते. तर वाचनाबद्दलच्या पुस्तकांबद्दल बऱ्याच गप्पा निघाल्या. ते मला म्हणाले की, सत्यकथेने सावरकरांच्या मृत्यूनंतर तीन अप्रतिम लेख प्रसिद्ध केले. एक होता वि.वा. शिरवाडकरांचा, एक होता शंकर वैद्यांचा आणि एक होता य.दि. फडके यांचा. य.दि. फडके यांच्या लेखाची भाषा जरा जहाल होती. मी तेव्हा धुळ्याला राहायचो. मी त्यांना भेटायला गेलो. मी त्यांना म्हटले की, ‘‘तुमच्या लेखाची भाषा जहाल आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आहे हे खरे!’’
मी म्हटलं, ‘‘मी त्यासाठी भेटायला आलो नाही. मला एक सांगा, तुम्ही अभ्यास कसा करता.’’
तेव्हा य.दि. फडके म्हणाले की, ‘‘मला जर कोणी या दिवाळी अंकात मला लेख लिहायला सांगितला तर मी त्याला म्हणतो की, मी पुढच्या दिवाळी अंकात लिहीन आणि मग मी त्या लेखकाची सगळी पुस्तकं जमवतो.’’
य.दि. फडकेंना मी जवळून पाहिलंय. ते माझ्या मित्राचे वडील, त्यामुळे मी घरी गेल्यावर नेहमी त्यांना पाहत असे. जणू डाव्या हाताला एखाद्या झाडाला कोंब फुटावा तसं डाव्या हाताला त्यांचं पुस्तक फुटलेलं असायचं, पण ते कायम पुस्तक समोर धरून वाचत असायचे. कोणीही त्यांच्या वाचनात व्यत्यय आणायचे नाहीत. ते खाली बसून वाचत…भिंतीला पाठ टेकून आणि आजूबाजूला सगळा घरातील पसारा आणि काम चालू. अशी माणसे खरीच भाग्यवान!
पत्रकारांना प्रचंड कामाच्या धबडग्यात वाचावे लागते. तळवलकर, प्रभाकर पाध्ये किंवा ‘लोकसत्ता’चे विद्याधरजी ‘नवशक्ती’चे खाडिलकर अशी मराठीला मोठी वाचक, संपादकांची परंपरा आहे. इंग्रजीतही अर्थात माल्कम मग्रीजपासून ते डेव्हिड रेम्निकपर्यंत वाचणाऱ्या संपादकांची मोठी परंपरा आहे. हिंदुस्थानात ‘सेमिनार’चे संपादक रोमेश थापर किंवा ‘ई.पी.डब्ल्यू’ चे संपादक कृष्णा ही माणसं स्वतः विद्वान होती आणि मोठी वाचक होती, पण या साऱ्यांमध्ये ‘महाविद्वान’सारखी पदवी द्यायची तर शामलाल यांना. शामलाल हे दर आठवडय़ाला एका पुस्तकाचे परीक्षण लिहीत आणि आणि जवळपास 40-50 वर्षे त्यांनी साधना केली. ‘टाइम्स’मधला कॉलम संपल्यावर त्यांनी ‘टेलिग्राफ’मध्ये ‘लाईफ ऍड लेटर’चा कॉलम लिहिला आणि त्याची आता तीन पुस्तकं झालेली आहेत.
इतक्या शिस्तीने आपल्याला वाचायला जमणार नसलं तरीही चांगला वाचक होणं हा एक सतत व्यायाम करण्यासारखा कष्टाचा अनुभव आहे आणि त्याची फळंही व्यायामासारखी, सुदृढ शरीराप्रमाणे, सुदृढ बुद्धी आहे, पण वाचन साधनेला कुठल्याच फळाची गरज नाही. याचं कारण कुसुमाग्रज म्हणत तसं फळाला फळ असत नाही.

























































