दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येणार; नाना पटोलेंनी सांगितलं कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान सोसावे लागत आहे. या पावसामुळे हाताशी आलेले पीक बळीराजाच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाले आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. ‘शिंदे-भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, दिवाळीनंतर हे सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे. राज्यपालांकडे यासंदर्भात भूमिका मांडली जाणार आहे’, अशी ठोस भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे.

नाना पटोले म्हणाले की, दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे. राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहे. आम्ही लवकरच राज्यपालांकडे ही भूमिका मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी या ‘ED’ सरकारने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत, असे नाना पटोले यांनी सांगितले.

शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एक रुपयादेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले असून विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्त झळ सोसावी लागत आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.