नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। शिर्डी

साईंच्या दर्शनाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो भक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. साईमंदिर व परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहेत. १०० हून अधिक पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. साईनामाच्या गजराने अवघी शिर्डी नगरी दुमदूमून गेली आहे.

दिवसभर शिर्डी कडे येणारे रस्ते गर्दीनी फुलले असून सायंकाळ पर्यंत देशाच्या काना कोपऱ्यातून १०० पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. वर्षाअखेरीस लाखो साईभक्त शिर्डीत गर्दी करतात. यावर्षीही अशीच विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे . साईबाबांवर श्रध्दा असणारे लाखो भक्त साईच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरूवात करत असतात रात्री बाराच्या ठोक्याला साईनामाचा जल्लोष करत नववर्षाचे स्वागत केले जाते. त्यानंतर साईंचे दर्शन घेतले जाते.

साई संस्थानतर्फे येणाऱ्या भाविकांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर व परिसर देशी विदेशी फुल व अद्ययावत विद्युत रोषणाई करून सजवले आहे. पोलिसांनीही सुरक्षेची जय्यत तयारी केली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. होणाऱ्या गर्दी मुळे स्थानिक व्यावसायिकांमधेही समाधानाचे वातावरण पसरले आहे.