शिरीषायन- कोणी त्य्य्यांना मोठं केलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरीष कणेकर

लेखक हा आयुष्यभर शब्दांशी व आरोपांशी खेळत असतो (कसं वाटलं वाक्य? व.पुं.चं असतं तर लगेच टाळय़ा वाजवल्या असत्या) वाङ्मयचौर्याचा आरोप कायमच कोपऱ्यावर दबा धरून बसलेला असतो अन् अगदी थेट वाङ्मयचौर्याचा नाही तरी शैलीच्या अनुकरणाचा आरोप कुठेच गेला नाही. कादंबरीकार ना. सी. फडक्यांच्या शैलीची अंध नक्कल केल्याचा आरोप वि. वा. पत्कींवर सर्रास होत राहिला. ते लिहीत राहिले. त्याचं पुढे काय होणार? काहीच नाही. शैलीचं अनुकरण कोर्टात सिद्ध करून तो शिक्षापात्र गुन्हा ठरविता येतो का? नाही ना, झालं तर मग! (मी ज्ञानेश्वरांसारखा लिहितो हे सोपानदेव किंवा मुक्ताबाईही सिद्ध करू शकल्या नसत्या. वाघावर बसून येणारे चांगदेव तरी या मानवी वाघाचे काय करू शकले असते?)

या परिस्थितीत नकले, उचले, ढापले सोकावले व फोफावले. आपली कथित लोकप्रियता ही आपलीच आहे असे भलभलते भ्रम त्यांना व्हायला लागले. वाचकांनी तरी ओरिजिनल उपलब्ध असताना नकलाकारांच्या भजनी का लागावे? हा प्रश्नच आहे. दिलीपकुमार असताना माणसं राजेंद्रकुमारची फॅन झाली होतीच म्हणा! नंतर मनोजकुमारचीही झाली. म्हणजेच त्यांच्यात ‘ओरिजिनल’ न आवडण्याची विकृती होती. शुद्ध स्वरूपातले ‘ओरिजिनल’ त्यांच्या प्रकृतीला मानवत नसावे.

हे नकलाकारांना फावले. ते स्वत:ला ‘ओरिजिनल’ समजायला लागले. उलट आपलीच नक्कल होते असा चमच्यांच्या कुशीत घुसून ते कांगावा करू लागले. भाडोत्री माणसं त्यांना थोपटू लागली.

संगीताचे आार्केस्ट्रे मला भावत नाहीत ते याचसाठी. रफी, लता, आशा, किशोर, मन्ना डे, तलत, हेमंतकुमार व मुकेश यांची मूळ गाणी त्यांच्याच आवाजात ऐकायला मिळतात तर मग यांच्या ‘डुप्लिकेट’ आवाजात गाणी का ऐकायची? ते बिचारे आपल्याकडून मनापासून व चांगले गात असतात, पण यांचे रफी हे रफी कसे वाटणार? यांची लता जर लता वाटू शकत असती तर काय पाहिजे होते? त्यातूनच प्रत्येक आार्केस्ट्रातून हे रफी, लता, आशा, किशोर, मन्ना डे, तलत, हेमंतकुमार व मुकेश गात असतात. त्यांचं गायन ऐकून ‘ओरिजिनल’वर पोसलेल्या आमच्यासारख्यांची पोटं कशी भरणार? आत्मे कसे संतुष्ट होणार? ‘आमच्या मुलाच्या आार्केस्ट्राला आले नाहीत’ अशी वैयक्तिक पातळीवर तक्रार नका हो करू. रहेम मेरे आका रहेम…

एका वाचकानं माझ्यावर घणाणता आरोप केला होता (आणि तो छापूनही आला होता. आमचं छापतात ठीक आहे…) तो म्हणाला, ‘दिलीपकुमार व लता मंगेशकर यांना शिरीष कणेकरांनी मोठं केलं!’

थुत् तुझ्या सासूच्या! म्हणजे दिलीपकुमार एक्स्ट्रासारखी चित्रपटात कामं करीत होता. फार तर मोहन चोटी किंवा माकमोहन किंवा सुधीर नटाइतका  लोकप्रिय तो होऊ शकला असता, पण माझ्या लेखणीच्या बळावर मी त्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवला होता. तीच कथा लता मंगेशकरची. वास्तविक तिची योग्यता फार तर कोरसमध्ये गाण्याची. पुढेमागे आपण कमल बारोट, उषा तिमोथी, शारदा यांच्याप्रमाणे पार्श्वगायिका व्हायचं हे लताचं अव्यक्त स्वप्न होतं. आणि बघा, मी तिला साक्षात लता मंगेशकर केलं. दगडातून देव निर्माण केला. एकदा नव्हे तर दोनदा. उगीच नाही, दर शुक्रवारी दिलीपकुमार रोज सकाळी माझ्या उंबरठय़ावरची धूळ मस्तकी धारण करून जायचा. लता मंगेशकरदेखील प्रत्येक रेकार्डिंगच्या आधी माइक बंद करून माझ्या नावाचा जप करायची व तिच्या छोटय़ा पर्समधून माझा छोटा फोटो काढून शिरी धारण करायची. ते दोघे मोठे नसते झाले तरच नवल. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो व ‘यशस्वी भव’ असं पुटपुटत होतो. एकदा प्रदीपकुमार, रहेमान, सज्जन व सुरेंद्रनाथ यांनी मध्ये यायचा प्रयत्न केला. मी त्यांना फुंकरीनं उडवून लावलं.

टवाळखोरी सोडा (करतोय मी आणि सांगतोय तुम्हाला!), पण खरोखरच अशी एखादी दिव्य शक्ती मला मिळाली असती किंवा मी जादूचा दिवा झाले असतो किंवा मी ‘चमत्कारी बाबा’ म्हणून ओळखला गेला असतो तर दिलीपकुमारला दिलीपकुमार करण्यात किंवा लता मंगेशकरला लता मंगेशकर करण्यात शक्तीचा अपव्यय करण्यापेक्षा मी जितेंद्रला मार्लन ब्रँडो करण्यात, धर्मेंद्रला बर्ट लँकेस्टर करण्यात, विश्वजितला पाल न्यूमन करण्यात, नवीन निश्चलला ग्रेगरी पेक् करण्यात व ए. के. हनगलला पाल म्यूनी करण्यात कष्ट खर्ची घातले असते.

तसेदेखील मी त्यांना लता मंगेशकर करावे म्हणून सुलक्षणा पंडित, दिलराज कौर व कृष्णा कल्ले माझ्या दाराबाहेर रांग लावून उभ्या होत्या. भारत भूषण, प्रदीपकुमार, करण दिवाण, मनहर देसाई या निर्जीव, निराकार ठोकळय़ांना मी नटश्रेष्ठ नसतं बनवलं का?…

असो. इतक्या विस्तृत  विवेचनानंतर तरी दिलीपकुमार व लता मंगेशकरला मीच मोठं केलं हे वाचकांना कळणार नाही अशी आशा आहे.

[email protected]