शिंदे औटघटकेचे मुख्यमंत्री! सुप्रीम कोर्टात शिवसेनेला न्याय मिळेल; अॅड. असीम सरोदे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खूप मोठी चूक केली आहे. एकनाथ शिंदे हे औटघटकेचे मुख्यमंत्री असून शिवसेना पक्ष व चिन्ह उद्धव ठाकरे यांना पुन्हा नक्की परत मिळेल, असा विश्वास अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला.

इंडिया आघाडीच्या वतीने ‘शिवस्वराज्य ’या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी न्यायालयाने दिलेला निकाल तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेली मांडणी यावर आपली मते स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले की, नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन सर्वोच्च न्यायालयाचाच अपमान केला आहे. तर भरत गोगावले यांना व्हीप म्हणून दिलेली मान्यतादेखील बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक अधिकारी भाजपचे पाळीव अधिकारी-
शिवसेनेचे हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचे नव्हते, तर राहुल नार्वेकर यांना न्याय देण्याचा कोणताही हक्क नव्हता, असे असीम सरोदे यांनी नमूद केले. त्यांनी केवळ एका ओळीचा आदेश देऊन हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात पाठवणे आवश्यक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक अधिकारी हे भाजपचे पाळीव अधिकारी बनले असल्याचेही सरोदे यांनी ठणकावून सांगितले.