शिवसेनेच्या जनता दरबारात तक्रार; 24 तासांत सुटला, राजारामपुरीतील पाण्याचा प्रश्न

कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही गेल्या तीन महिन्यांपासून राजारामपुरी परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रखडला होता. अखेर शिवसेना नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या जनता दरबारातील तक्रारीनंतर दुसऱयाच दिवशी तो सुटला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या शहरप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महापालिका यंत्रणा आणि अधिकारी कामाला लागून शुक्रवारी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू झाला.

राजारामपुरीत 8व्या व 9व्या गल्लीत सुमारे 40 पेक्षा जास्त अपार्टमेंट आहेत. नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे रितसर महिन्याला पाणी बिलही भरावे लागते. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. महापालिका प्रशासनाला याबाबत निवेदने देऊन, आंदोलने करूनही फरक पडला नव्हता.

अखेर विरोधी पक्षनेते दानवे यांच्याकडे थेट जनता दरबारात माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे यांच्यासह नागरिकांनी तक्रार केली. यावेळी दानवे यांनी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना 24 तासांत पाणीपुरवठा सुरळीत करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर यंत्रणा गतिमान झाली. व्हॉल्वसह इतर दुरुस्त्या आणि पाइपलाइनची कामे करण्यात आली. दरम्यान, राजारामपुरीत 9व्या गल्लीतील अनेक घरांत पावसाळ्यात पाणी घुसते. त्याठिकाणी स्ट्रॉम वॉटरचे काम करण्याचे आदेशही विरोधी पक्षनेता दानवे यांनी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना यावेळी दिले.