
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळासाठी पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे. मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून या मुलाखती घेतल्या जात असून बारावी शिकलेले विद्यार्थी पालिकेच्या डी.एड, बी.एड. झालेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेत असल्याबद्दल आज शिवसेनेच्या सदस्यांनी शिक्षण समितीमध्ये आक्षेप घेतला.
इंटरनॅशनल बोर्डाच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) स्थापन केले आहे. यात राज्यातील 100 शाळा समाविष्ट केल्या जाणार आहेत. राज्य सरकारच्या या उपक्रमासाठी पालिका प्रशासनाने अक्षरशः पायघडय़ा घातल्या आहेत. पालिकेच्या 26 शाळा या बोर्डासाठी देण्याचाही निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शिक्षण समितीच्या गेल्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी एमआयईबी या बोर्डाचा अभ्यासक्रम नक्की काय आहे ते आधी शिक्षण समितीसमोर ठेवा, पालिकेच्या शाळांतील मुलांसाठी योग्य आहे का याचा निर्णय शिक्षण समिती घेईल अशी भूमिका मांडली होती, मात्र तरीही प्रशासनाने शिक्षणाधिकारी कार्यालयात पालिका शाळांमधील शिक्षकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. याचे आजच्या शिक्षण समितीच्या बैठकीत चांगलेच पडसाद उमटले. शिवसेनेचे सदस्य सचिन पडवळ यांनी प्रशासनाच्या या कारभाराबद्दल आक्षेप घेतला. या बोर्डला आमचा विरोध नसून या बोर्डबाबत व अभ्यासक्रमाबाबत शिक्षण समितीला कळवले पाहिजे या भूमिकेचा पडवळ आणि दुर्गे यांनी पुनरुच्चार केला.
शिक्षण समितीला विश्वासात घेऊनच निर्णय घ्या
पालिका कार्यक्षेत्रात शिक्षण विषयासंदर्भात कोणतीही योजना राबवली जात असल्यास शिक्षण समितीला प्रशासनाने माहिती दिलीच पाहिजे. राज्य सरकारची योजना असली तरी शिक्षण समितीला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. या नव्या योजनेबाबत एक विशेष बैठक बोलावण्याची मागणी सदस्यांनी केल्यानंतरही प्रशासन आपले निर्णय लादत असेल तर ही गंभीप बाब असून याबाबत प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर विशेष बैठक आयोजित करून भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी दिले.

























































