
सामना प्रतिनिधी । मुंबई
उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या हजारो शेतकरी व आदिवासींच्या न्याय्य मागण्यांसाठी गुरुवारी विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेतले. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, बुलढाणा, संभाजीनगर या विविध भागांतील हजारो शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांचा हजारोंच्या संख्येने संघर्ष मोर्चा मुंबईत दाखल झाला होता. तत्पूर्वी आंदोलक शेतकरी ठाणे येथे मुक्कामी असते वेळी आमदार रवींद्र फाटक यांनी तेथे भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या होत्या.
आंदोलकांच्या मागण्यांसाठी सभागृहात आमदार रवींद्र फाटक व शिवसेनेच्या सर्व आमदारांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्यात यासाठी जोरदार आवाज उठवला. या मागण्यांमध्ये उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा, सरसकट दोन रुपये किलोने धान्य मिळावे, शेतकऱयांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, गायरान जमीनधारकांना जमिनीचे मालक करण्यात यावे आदी विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आमदार रवींद्र फाटक यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडून न्याय देण्याची मागणी केली. या वेळी सभापतींनी या प्रकरणी योग्य लक्ष घालून आंदोलकांसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासनही या वेळी दिले. या मागणीसाठी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, अनिल परब, विलास पोतनीस, नरेंद्र दराडे, व इतर आमदारांनी जोरदार समर्थन दिले.



























































