मोदींची विचारसरणी औरंगजेबासारखी! उद्धव ठाकरे कडाडले

कत्तलखाने चालवणाऱ्यांकडून आणि गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडून निवडणूक रोखे घेऊन भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवणार असेल तर या निवडणुकीत जनता तुम्हाला कापणार नाही तर कोणाला कापणार? भाजपचं सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाबद्दल सांगण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही.

औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोदचा. मराठी मुलुख गिळण्यासाठी तो महाराष्ट्रात 26 वर्षे ठाण मांडून बसला. तरी मराठी दौलतीचे तो काहीच वाकडे करू शकला नाही. याच मातीत तो गाडला गेला, असा इतिहास सांगतानाच मोदी-शहांची वृत्ती आणि विचारसरणीही औरंगजेबासारखीच आहे. तेही औरंगजेबासारखी फोडाफोडी करत आहेत. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे. मुंबई विकायची आहे आणि मराठी माणूस संपवायचा आहे. या कारस्थानात बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे आड येतात म्हणून शिवसेनेचे दोन तुकडे केले. त्याने समाधान झाले नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली. काँग्रेसच्या चव्हाणांनाही घेऊन गेले. कचऱ्याची गाडी घेऊन फिरताहेत. इकडून तिकडून कचरा गोळा करत सुटलेत. त्याचा काडीमात्र उपयोग होणार नाही. तुमची गाठ माझ्या मर्द मावळ्यांशी आहे हे ध्यानात ठेवा, असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

मातृतीर्थ सिंदखेडराजा आणि शारंगधर बालाजीची पावनभूमी असलेल्या मेहकरात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवादाचा भगवा झंझावातच आला होता. रणरणत्या उन्हात उद्धव ठाकरे यांची तलवारच तळपली! खास ठाकरी शैलीत त्यांनी भाजप, गद्दारांची सालटी काढली. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, छगन मेहेत्रे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने आदींची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे कडाडले, काय तो अहंकार! मी आणि फक्त मीच. सगळीकडे मीच. माझेच पह्टो. अगदी सुलभ शौचालयावरही! आता यांचे पह्टो पाहून काय सुलभ होणार का! पण मीपणाचा अहंकार. खताच्या गोणीवरही मोदींचा पह्टो! आता काय तर शेणखत! देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आहे हा. कोटय़वधी रुपये खर्चून हे पह्टो टाकलेत खतांच्या गोण्यांवर. आता आचारसंहिता लागलीय, त्यामुळे झाकताही येत नाही अन् उघडेही ठेवता येत नाही. मोदीखत पेरले की गद्दारीला अंकुर फुटतील असे यांना वाटते. मोदीजी, लक्षात ठेवा… ही माँसाहेब जिजाऊंची, छत्रपती शिवरायांची भूमी आहे. इथे गवताला भाले फुटतात. मराठी मुलुख गिळण्यासाठी औरंगजेबही आला होता. 26 वर्षे ठाण मांडून बसला. इकडेच मेला. पण मराठी दौलतीचे काही वाकडे करू शकला नाही. पण औरंगजेबाने एक मात्र सांगितले होते. इथे दुहीचे बीज खडकावरही अंकुरते. तमाम दौलत तबाह करते. हीच औरंगजेबी नीती वापरून सध्या तोडा, पह्डा आणि राज्य करा असे चालू आहे.

एक अकेला, सब पे भारी अशा वल्गना करत शिवसेना पह्डली, राष्ट्रवादी पह्डली. अशोक चव्हाणांनाही घेतले. कचरागाडी घेऊन दारोदार फिरून कचरा गोळा करताहेत. खुशाल कचरा गोळा करा. कितीही प्रयत्न करा, या भूमीत गद्दारीचा अंकुर रुजणार नाही. अटलजी या मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते. तेव्हा चंद्राबाबूही होते. शिवसेनाप्रमुखांनी अडवले. मोदींना हटवू नका, असे त्यांनी सांगितले. शिवसेना पाठीशी उभी राहिली म्हणून आज हे दिसताहेत. ज्यांनी वाचवले, जे पाठीशी उभे राहिले त्यांच्याच पाठीवर पाय देणारी ही वृत्ती ठेचलीच पाहिजे! जिजाऊंचे दर्शन घेताना ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’ जर ही गद्दारी आपण गाडणार नसू तर जिजाऊ, शिवरायांचे नाव घेण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी परत आलो, येताना दोन पक्ष पह्डून आलो! निर्लज्जपणाने सांगताय. देवेंद्र फडणवीस, लाज वाटली पाहिजे, एवढी वर्षे काम करूनदेखील पक्ष पह्डण्याची वेळ आलीय तुमच्यावर! तुमच्या या पह्डापह्डीची आता लोकांना लाज वाटतेय. लोकांचे पैसे चोरून श्रीमंत झालात! थूत् तुमच्या असल्या श्रीमंतीवर! औरंगजेबाचा जन्म गुजरातेतलाच. त्यामुळे मातीचा गुण लागणारच. औरंगजेबानेही पह्डापह्डीचेच राजकारण केले. पक्षपह्डीची वृत्तीही औरंगजेबीच, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात हे कुठे होते? यांचे राजकीय मायबाप जनसंघ, संघवालेही नव्हते. यांच्याकडून आम्ही काय गद्दारी शिकायची का, असा पलटवारही त्यांनी केला.

सगळे काही देऊनही गद्दार पळाले

शिवसेनेने काय दिले नाही या गद्दारांना? आमदार केले, खासदार केले. इथल्या गद्दाराला तर किती वेळा लोकसभेवर पाठवले? पण तुम्ही दिलेल्या मताला जागले नाहीत. शिवसेनेमुळे यांना हे वैभव मिळाले. बुलढाण्याचा सातबारा काय यांच्या नावावर करून दिलेला नाही. अशा बुजगावण्याचे या निवडणुकीत डिपॉझीट जप्त झालेच पाहिजे, करणार का? असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच समस्त सभेने हात उंचावून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता आपण जर चुकलो तर रशियासारखे होईल. विरोधकांचे नामोनिशाण संपवून पुतीन पाचव्यांदा हुकूमशहा बनलेत! आपल्याकडेही हुकूमशाहीचे अंकुर फुटत आहेत. ते वेळीच ठेचले पाहिजेत. स्वातंत्र्य हवे की गुलामी? महाराष्ट्र राखणाऱ्याला की महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत देणार, याचा निर्णय घेण्याची निर्णायक वेळ आता आली आहे. आता योग्य निर्णय घेतला नाही तर अराजक निर्माण होईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

चोरलेल्या संपत्तीचे काय कौतुक करता, असा टोला लगावतानाच त्यांनी हैदराबादच्या कुतुबशहाचे मग्रुरीचे उदाहरण दिले. कुतुबशहाच्या भेटीला गेलेल्या छत्रपतींना त्याने आपल्या ताकदीचे दर्शन घडवले. सैन्य दाखवले. घोडदळ, पायदळ दाखवले. हत्तीदल दाखवून त्याने तुच्छतेने विचारले, तुमच्याकडे हत्ती नाहीत? महाराजांनी त्यावर ‘माझ्याकडे हत्ती नाहीत; पण हजार हत्तींचे बळ असलेली माणसे आहेत!’ असे बाणेदार उत्तर दिले. त्यावर आदिलशहाने ‘करायचा का सामना?’ अशी मग्रुरी दाखवली. महाराजांच्या शेजारी येसाजी पंक उभा होता. महाराजांनी इशारा करताच येसाजी मस्तवाल हत्तीला सामोरा गेला. निमिषार्धात त्याने तलवार उपसून हत्तीची सोंडच कापली! हा भीमपराक्रम पाहून आदिलशहाची बोलतीच बंद झाली. आम्हीही त्याच विचारांचे आहोत, आमच्याशी मुकाबला करताना विचार करा, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट बजावले.

या जनसंवाद सभेला नंदलाल जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जिजा राठोड, युवासेना जिल्हा अधिकारी नंदू कऱहाडे, जिल्हा संघटक सदानंद माळी, माजी सभापती भास्करराव गारोळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. आशीष रहाटे, जिल्हा संघटक गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, लोणार तालुकाप्रमुख दीपक मापारी, उपतालुकाप्रमुख रमेश देशमुख, सुरेश काटोळे, शहरप्रमुख किशोर गारोळे, गजानन जाधव (लोणार), युवासेना तालुका युवाधिकारी अॅड. आकाश घोडे, जीवन घायाळ (लोणार), युवासेना शहर युवाधिकारी ऋषी जगताप, श्रीकांत मादनकर (लोणार), संदीप गारोळे, महिला आघाडी शहर संघटक पौर्णिमा गवई, अॅड. बाळासाहेब गवई, परमेश्वर किसन पाटील, प्रकाश डोंगरे, शाम निकम, विभागप्रमुख साहेबराव हिवाळे, विलास शिंदे, प्रा. गणेश बोचरे, आकाश घोडे आदींची उपस्थिती होती.

महाराजांनी सुरत लुटली, सुरतवाले महाराष्ट्र लुटताहेत

अफजलखान मराठी दौलतीवर चालून आला. त्याने मराठी मुलुखातील सरदार, वतनदारांना लालूच दाखवली. मराठी माणूस पह्डला. कान्होजी जेधे यांनाही अफजलखानाने निरोप पाठवला.   इकडे या, नाहीतर कापले जाल! जेधे आपल्या पाच मुलांना घेऊन महाराजांकडे आले. महाराजांना त्यांनी खानाचा सांगावा सांगितला.  महाराज म्हणाले, वतनदारी घ्या, जा तिकडे. कान्होजींनी हातात पाणी घेतले, महाराजांच्या पायावर सोडले आणि म्हणाले, महाराज… वतन वाहिले, ही पाच मुले वाहिली… भगव्याला डाग लागेल असे कोणतेही पाप माझ्या हातून होणार नाही. कान्होजी जेधेंचे उदाहरण देतानाच उद्धव ठाकरे यांनी गद्दारांची सालटी काढली. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राकडे बघण्याची यांची हिंमत नव्हती. आता लाचारांचे राज्य आहे. महाराजांनी सुरत लुटली, आता सुरतवाले महाराष्ट्र लुटत असल्याचे पाहून अत्यंत वेदना होतात. सगळे गुजरातकडे. आता दोन सेमी पंडक्टरचे प्रकल्पही गुजरातला नेले. आमचा गुजरातला विरोध नाही, पण आमच्या हक्काचे ओरबाडून त्यांना देणार असाल तर अजिबात खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. निष्ठा काय असते हे संजय राऊत आणि नितीन देशमुख यांना विचारा. महाराजांच्या काळात सूर्याजी, खंडोजी, अनाजीपंत असे गद्दारच होते. चारशे वर्षांनंतरही हे गद्दार म्हणूनच ओळखले जातात. गद्दारीचा शिक्का कपाळी घेऊन फिरणाऱ्यांना कित्येक जन्म घेतले तरी हा कलंक पुसता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसैनिकांवर गुन्हे दाखल कराल तर याद राखा!

सध्याचा काळ कसोटीचा आहे. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. नामर्द लेकाचे! शिवसैनिकांना का त्रास देताय? मी येतो, माझे शिवसैनिक येतील. जरा ते भाडोत्री बाजूला करा आणि होऊनच जाऊ द्या हिंमत असेल तर! मी मॅच खेळणारा आणि जिंकणारा आहे. ज्यांनी निवडून आणले त्यांनाच शिव्या! लक्षात ठेवा, दिवस सगळेच सारखे नसतात. थोडे दिवस थांबा, आपलेही दिवस येणारच आहेत. पण या गद्दारांचा सूड घेणार की नाही, ही गद्दारी ठेचून काढणार की नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच अवघ्या गर्दीने ‘होय!’ असे खणखणीत उत्तर दिले.

शिवसेनेच्या नावावर व्यापार करणाऱ्यांनी गद्दारी केली

1989मध्ये या भागात शिवसेनेच्या विचारांचे बीजारोपण झाले. त्याचा आता महावृक्ष झाला आहे. याची फळे अनेकांनी चाखली. ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या, निवडून आणले तेच गद्दारी करून निघून गेले. पण चिंता करण्याचे कारण नाही. येणारा काळ निष्ठावानांचा आहे. गुंडगिरीची भाषा करू नका, हा वाघ आहे, डरकाळी पह्डली तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

गद्दारी गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही

राज्यातील गद्दारांचे सरकार काय करतेय… त्यांचे त्यांनाच कळत नाहीय ते काय करताहेत. शेती, शेतकरी अडचणीत आहे. पण सरकार ढिम्म. मोदी सरकारही तसेच. पह्डापह्डी करणे आणि आपली खुर्ची शाबूत ठेवणे एवढेच यांचे काम. त्यामुळे आता या निवडणुकीत गद्दारी गाडावीच लागेल… त्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

जिजाऊंना साकडे

माँसाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्रभूमीत एक तेज जन्माला घातले. छत्रपतींना स्वराज्याची प्रेरणा त्यांनीच दिली. त्यामुळेच मराठी दौलतीचा पसारा वाढला. त्यांच्यामुळेच आम्ही आहोत. स्वराज्याचा वन्ही चेतवणाऱ्या जिजाऊंसमोर मी एकच मागणे मागितले. शिवरायांचा महाराष्ट्र लुटला जातोय. सुरतवाले लुटताहेत. हे सगळे थांबवण्यासाठी शक्ती दे, तेच तेज पुन्हा अवतरू दे! भवानी तलवार अवतरू दे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.