Lok Sabha election 2024 : भुमरे, जलील प्रचारासाठी थेट न्यायालयात, सरन्यायाधीश, विधी सचिवांकडे तक्रार

छत्रपती संभाजीनगरातील मिंधे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे आणि मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीनचे उमेदवार इम्तियाज जलील हे प्रचारासाठी थेट न्यायालयात पोचल्याने खळबळ उडाली. उमेदवारांनी वकिलांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. भुमरे, जलील यांच्या थेट न्यायालयातील प्रचाराला आक्षेप घेण्यात आला असून यासंदर्भात सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला आहे. आचारसंहिता लागू असल्याने न्यायालये, सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये उमेदवारांना थेट प्रचार करता येत नाही. मात्र हा संकेत झुगारून दोन दिवसांपूर्वी मिंधे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे हे थेट उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयात पोहोचले. तेथे त्यांनी वकिलांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी त्यांच्यासोबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हेदेखील होते. उच्च न्यायालयाच्या ग्रंथालयासही त्यांनी भेट दिली. वकील संघाच्या पदाधिकाऱयांनी भुमरे यांचे स्वागतही केले. संदिपान भुमरे यांच्यानंतर मजलीसचे उमेदवार इम्तियाज जलील यांनीही जिल्हा न्यायालयात जाऊन वकिलांच्या भेटीगाठी घेतल्या. जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱयांनाही ते भेटले. न्यायालयाच्या आवारात येऊन उमेदवारांनी प्रचार करण्यास खंडपीठ वकील संघाचे माजी सदस्य शोमितकुमार साळुंके यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे.