हमास- इस्रायल युद्धाबाबत पक्षाच्या भूमिकेबाबत चुकीच्या लेखाचा शिवसेनेकडून निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हमास-इस्रायल -पॅलेस्टाईन संघर्षाबाबत एका प्रमुख वृत्तपत्रात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भूमिकेबाबत लेख छापण्यात आला आहे. त्यात पक्षाने एका भूमिकेचे समर्थन केल्याचे म्हटले आहे. मात्र, हा लेख निराधार असल्याचे सांगत तो मुद्दाम छापण्यात आला असून पक्षाकडून त्याचा निषेध करण्यात आला आहे. पक्षाने किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या देशाचे आणि देशात आलेल्या याआधीच्या सरकारचे तेथील नेत्यांशी कसे संबंध होते, या इतिहासाबाबत माहिती दिली आहे, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याबाबत एक्सवर पोस्ट करत या लेखाचा निषेध केला आहे. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्या सुरु असलेल्या इस्रायल-हमास-पॅलेस्टाईन संघर्षाच्या संदर्भात एका विशिष्ट भूमिकेचे समर्थन केले आहे, असा लेख एका अग्रगण्य दैनिकात मुद्दाम छापण्यात आला आहे. आम्ही ह्या निराधार आणि वाईटरित्या संशोधन केलेल्या लेखाचा निषेध करतो.

संजय राऊतजी किंवा पक्षाने कोणत्याही भूमिकेचे समर्थन केलेले नाही. ते एका मीडिया कॉन्फरन्समध्ये बोलत होते, जिथे त्यांनी आपल्या देशाचे आणि त्या देशाचे, तिथल्या नेत्यांसोबतचे संबंध कसे होते ह्या इतिहासाबद्दल सांगितले आहे. आपल्या देशातील एकापाठोपाठ एक आलेली सरकारे, मग ते काँग्रेस असो किंवा भाजप, साऱ्यांचे ह्या देशाशी समान संबंध राहिले आहेत, असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.