
राज्यात सध्या गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असताना सरकारकडे यातील कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच ललित पाटीलचा शिवसेनेशी संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष होता असे म्हणायचे का, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज लगावला आहे.
ललित पाटील हा अटकेवेळी शिवसेनेचा नाशिक शहर अध्यक्ष असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील सत्य सर्वांना माहीत आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे ठामपणे शिवसेनेची बाजू मांडत आहेत. मात्र आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सरकारकडे कोणतीही उत्तरे नाहीत. यातूनच शिवसेनेवर आरोप केले जात आहेत. अटकेवेळी जर ललित पाटील शिवसेनेचा नाशिक शहरप्रमुख होता असे फडणवीसांचे म्हणणे असेल तर बॉम्बस्पह्टावेळी दाऊद भाजप अध्यक्ष होता असे समजायचे काय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


























































