गद्दारांना माफी नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले, दगाबाजांना पुन्हा शिवसेनेत घेणार नाही!

शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना माफी नाही म्हणजे नाही. काहीही झाले तरी दगाबाजांना पुन्हा शिवसेनेत घेणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले. गद्दार मिंध्यांना आता राजकीय करीअर विशेष असे राहिलेलेच नाही. त्यांना त्यांची खरी किंमत कळली आहे, असे फटकारतानाच येणाऱया निवडणुकीत मस्तवाल गद्दारांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘मातोश्री’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये वादंग सुरू आहेत. मिंधे गटातील खासदारांची तिकिटे कापली जात आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. त्यातील कुणी शिवसेनेच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न यावेळी प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यावर अनुभवासारखा उत्तम गुरू नसतो आणि गद्दारांचा गुरूच त्यांना पुढे काय करायचे ते सांगेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकरांनी काहीही टीका केली तरी प्रत्युत्तर देणार नाही

प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाबाबत शिवसेनेवर केलेल्या टीकेचा मुद्दाही माध्यमांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर, प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे ऋणानुबंध होते. त्यामुळे त्यांनी कितीही टीका केली तरी शिवसेनेचे कुणीही त्यांना काहीही बोलणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आंबेडकरांचे संविधान धोक्यात आले असताना आपण एक होऊन हुकूमशहांना दाखवून द्यायला हवे होते, असे आपण प्रकाश आंबेडकर यांना सांगितले होते. पण घटनेने मत मांडण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच दिले आहे आणि ते टिकवण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेने एकत्र यायला हवे असे शिवसेनेचे मत होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

एकतर मैत्री करा किंवा लढत; मैत्रीपूर्ण लढत नसतेच

सांगलीत शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसने तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असा इशारा दिला आहे. त्यावर मैत्रीपूर्ण लढतीला अर्थ नसतो, एकतर मैत्री करा किंवा लढत करा असे असते. मैत्री असते तेव्हा लढत नसते, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही काँग्रेसने तसा लढतीचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा घात होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सांगलीत शिवसेनेचा प्रचार सुरू झाला असून संजय राऊत येत्या एक-दोन दिवसांत तिथे जाणार आहेत, अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली.

हे खरे बंड, शिवसेनेत झाली ती गद्दारी

‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपची वृत्ती आहे. तिचा फटका आम्ही पाहिला. आम्ही त्याविरुद्ध उभे राहिलो, पण त्यांच्या पक्षातील कट्टर निष्ठावंतांनाही फेकून देण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. त्याविरुद्ध उन्मेष पाटील यांनी त्यांच्या असंख्य सोबत्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. याला खरे बंड म्हणतात. शिवसेनेत झाली ती गद्दारी होती. त्यांना सर्व जग खोकेबाज म्हणते. पण गद्दारी आणि बंडखोरी यातला फरक उन्मेष पाटील यांनी जगाला दाखवून दिलेला आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

भाजप खासदार उन्मेष पाटील शिवसेनेत

‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जळगावचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. आतापर्यंत जळगाव मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत होतो, पण यापुढे तिथे शिवछत्रपतींचा अस्सल भगवा जळगावातून लोकसभेत जाईल, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उन्मेष पाटील यांनी आमदार आणि खासदार म्हणून जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रात वाखाणण्याजोगी विकासकामे केली होती. खासदारकीच्या निवडणुकीत चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन ते विजयी झाले होते; परंतु त्यानंतरही भाजपात डावलले गेल्याने ते नाराज होते. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत पारोळय़ाचे नगराध्यक्ष करण पवार व अन्य पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवबंधन हाती बांधले. उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे स्वागत करतानाच त्यांना मार्गदर्शनही केले.
‘भाजपात जे गेले त्यांची ओळख खोकेबाज म्हणून झाली आहे. तुम्ही जनतेची सत्ता आणण्यासाठी सत्ताधाऱयांना सोडून शिवसेनेत आला आहात. तुमच्यासारखीच आमचीही फसगत झाली होती. तुमचे आणि आमचे ध्येय एकच आहे. आपला भगवा एकच आहे. पण आता फसगत करणाऱया लोकांना आपण निवडून द्यायचे नाही’ असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी उन्मेष पाटील आणि समर्थकांना केले. आता यापुढे एकत्रित वाटचाल करून विकासाच्या आड येतील त्यांची वाट लावून दिल्लीत पोहोचू, अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी देताच, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘देश का नेता कैसा हो, उद्धव साहेब जैसा हो’ अशा घोषणांनी ‘मातोश्री’चा परिसर दुमदुमला.

उन्मेष पाटील यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला ताकद मिळेल – संजय राऊत

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही यावेळी उन्मेष पाटील यांचे अभिनंदन केले. उन्मेश पाटील हे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते; परंतु निष्ठावंतांच्या नशिबी नेहमीच संघर्ष असतो. म्हणूनच ते निष्ठावंतांची कदर करणाऱया शिवसेनेत आले आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. उन्मेष पाटील यांच्या रूपाने जळगावसह उत्तर महाराष्ट्रातले एक नेतृत्व आज शिवसेनेत सहभागी झाले आहे. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱयांनीही त्यांच्याबरोबर शिवसेनेत प्रवेश केला. उन्मेष पाटील यांच्या शिवसेनेत येण्याने शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात ताकद मिळेल आणि जळगावची निवडणूक केवळ रंगतदार होणार नाही, तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

भाजपात निष्ठावंतांना किंमत नाही – उन्मेष पाटील

प्रामाणिक कार्यकर्त्यांची अवहेलना करणाऱया भाजपमध्ये स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानी बाण्याने लढणाऱया शिवसेनेत आलो, अशा भावना यावेळी उन्मेष पाटील यांनी व्यक्त केल्या. ‘उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज आहात का, असे मला अनेकजण विचारत आहेत; पण राजकारण करताना आमदार, खासदार होणे एवढेच माझे ध्येय नव्हते तर समाजाच्या विकासासाठी मी सातत्याने काम केले. आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता; परंतु भाजपाला त्याची किंमत नाहा.’ असे उन्मेष पाटील म्हणाले. मागील वेळेस शिवसेना भाजपच्या पाठीशी होती म्हणून आपण 4 लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आलो होतो, असेही ते म्हणाले.

भाजपमध्ये विकासाऐवजी विनाशाची आणि बदलाऐवजी बदल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजवली जात आहे असा आरोप करतानाच, त्या पापाचा वाटेकरी आपल्याला व्हायचे नाही, असे उन्मेष पाटील म्हणाले. एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे याचा मला आनंद आहे, असे ते पुढे म्हणाले.

कुठल्याही पदासाठी किंवा खासदारकीसाठी आपण शिवसेनेत आलो नाही. भाजपमध्ये स्वाभिमान जपला जात नसेल, बैठकीला बोलावले जात नसेल तर शिवसेनेची क्रांतीची मशाल हाती घेतली पाहिजे या विचाराने आपण शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची मशाल मनामनात रुजवू, असा विश्वासही उन्मेष पाटील यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत, जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ऍड. ललिता पाटील, विजय पाटील, अनंत निकम आदी उपस्थित होते.

जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील, पारोळय़ाचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी बुधवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उपस्थित होते.

‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपाची वृत्ती आहे. उन्मेष पाटील हे प्रवाहाच्या विरोधात उडी मारून शिवसेनेत आले आहेत. त्यांनी घाबरू नये. इकडे जनमताचा प्रवाह आहे. तो फिरला की त्यात मोठमोठी ओंडकी वाहून जातात तशी भाजप वाहून जाईल!

कुणीही किडुकमिडुक इकडून तिकडे गेले की शिवसेनेला धक्का अशा बातम्या येतात; पण शिवसेना धक्का खाणारी नाही, तर जोरात धक्का देणारी आहे.