
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील भाजप नेते व सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ शिवाजीराव जाधव यांनी हिंगोली लोकसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा शिवसेनेचे मराठवाडा समन्वयक अर्जुन खोतकर यांनी आज वसमत येथे येऊन अॅड. जाधव यांची भेट घेत त्यांच्याशी यशस्वी शिष्टाई केली. त्यानंतर जाधव यांनी हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अॅड. जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर शिवाजीराव जाधव यांनी महायुतीचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असून सर्व कार्यकर्त्यांनीही भक्कमपणे शिवसेना-भाजपा महायुतीच्या विजयासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन अर्जुन खोतकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. भाजप नेते शिवाजी जाधव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करुन अपक्ष म्हणून उडी घेतल्याने या निवडणुकीत रंगत चढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. जाधव यांच्याशी चर्चा करण्याकरिता वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज वसमत येथे आले होते. खोतकर यांनी जाधव यांच्या सोबत सविस्तर चर्चा करुन त्यांचे मन वळविले. तसेच मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची चर्चा भ्रमणध्वनीवर घडवून आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री अर्जुन खोतकर या दोघांशी झालेल्या चर्चेनंतर जाधव हे उमेदवारी मागे घेण्यास राजी झाले. त्यानंतर तातडीने त्यांनी हिंगोलीत येऊन निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जात अर्ज मागे घेतला. याबद्दल महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जाधव यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी बोलतांना शिवाजीराव जाधव यांनी मोठ्या ताकदीने महायुतीचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनाही प्रचारात उतरुन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री खोतकर यांच्या विनंतीनुसार अर्ज मागे घेत असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.































































