
मध्य प्रदेशात पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर सोमवारी पडदा पडला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नावावर पुन्हा भाजपने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शिवराजसिंग चौहान यांच्या नावावर विक्रम झाला आहे. सोमवारी रात्री 9 वाजता राजभवनात ते शपथ घेणार, असे सांगण्यात आले होते. ज्योतिरादित्य सिंधीया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या 22 समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मध्य प्रदेश विधानसभेत 230 सदस्यसंख्या असून 2 सदस्यांचे निधन झाल्याने 228 विद्यमान सदस्य आहेत. काँग्रेस बंडखोर 22 सदस्यांचे राजीनामे मंजूर झाल्यास बहुमतासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ राहणार आहे. विद्यमान 205 सदस्यांपैकी बहुमतासाठी 103 सदस्य लागणार आहेत. बहुमतासाठी भाजपकडे 107 सदस्यसंख्या असून काँग्रेसकडे 92 व अपक्ष 7 असे एकूण 99 सदस्य आहेत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून नरेंद्रसिंह तोमर, नरोत्तम मिश्रा, माजी केंद्रीयमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या नावाची चर्चा होती. पंरतु, सलग 13 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंग चौहान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवराजसिंग चौहान यांना सत्तेत आल्यानंतर बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
24 जागांसाठी 6 महिन्यांत पोटनिवडणुका
मध्य प्रदेशातील राज्य सरकारला सहा महिन्यांनंतर पुन्हा धोक्याची घंटा नाकारता येत नाही. भाजपला सत्तेत राहण्यासाठी पोटनिवडणुकीत किमान 9 जागा जिंकाव्या लागणार आहेत. सहा महिन्यांत काँग्रेसला आपले विद्यमान आमदार सांभाळण्याची कसरत घ्यावी लागेल. त्यामुळे मध्य प्रदेशात सत्तेचे हे नाटक सहा महिन्यांनंतर पुन्हा घडू शकते.

























































