शिवसेनेचा पाया मजबूत, पुन्हा महाराष्ट्रावर भगवा फडकणार – खासदार विनायक राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुदैवाने खरेदी विक्रीच्या दुकानात शिवसेनेचे 40 आमदार विकले गेले. घोडेबाजार झाला. हे आमदार बळी पडले. शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नुकसान झाले असले तरी शिवसेनेचा ढाचा, शिवसेनेचा पाया मजबूत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. दररोज मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत आहेत. हीच मोठी उर्जा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मिळत असून पुन्हा एकदा शिवसेनेचे संगठन मजबूत करण्याचा निर्धार केला आहे, असे शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खासदार राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. 10 जुलै रोजी शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा भगवे चैतन्य उसळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, मला माझ्या रत्नागिरीतील शिवसैनिकांचा अभिमान वाटतो. आमदार उदय सामंत यांनी त्यांच्या पाली येथील निवासस्थानी काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून आपण शिंदे गटात सामिल होत असल्याचे सांगितले. त्यावेळी तुम्हाला जायचे तिकडे जा, आम्ही शिवसेनेतच राहणार, असे शिवसैनिकांनी त्यांना ठणकावून सांगितले. त्यांचा मला अभिमान आहे, असे खासदार राऊत म्हणाले.

2004 ला एकनाथ शिंदेची शिफारस केली ते माझं मोठं पाप…
2003 मध्ये मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्याचा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातून उमेदवारीसाठी सतीश प्रधान यांच्या कपाळाला टिळा लावला होता. पण मी त्यावेळी बाळासाहेबांना सांगितल की, सतीश प्रधान यांना तुम्ही विधानपरिषद किंवा राज्यसभा द्या. एक तरुण कार्यकर्ता आहे, त्याला संधी द्या, असे म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या नावाची शिफारस केली होती. पण आज मला ते पाप केलं असं वाटतंय, अशी खंत खासदार राऊत यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, लोकसभा मतदार संघाचे सह संपर्कप्रमुख निलेश पराडकर, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, माजी जि. प. उपाध्यक्ष उदय बने उपस्थित होते.

उल्हास बापट आणि प्रा. हरी नरके यांचे आभार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा भाजप चेंदामेंदा करत आहे. स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या विषयावर घटनातज्ञांनी व्यक्त व्हावे, असे आवाहन केले आहे. घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपली परखड मते मांडली आहेत. त्याचबरोबर प्रा. हरी नरके यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या दोघांचे आम्ही आभार मानतो.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 71 पैकी 60 जणांना ईडी
ईडीचा वापर करून तसेच 50 खोके देऊन आमदार फोडले. आज जर आपण भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 71 जणांची यादी पाहिली तर त्यातील 60 जणांना ईडी लावण्यात आली होती, असे राऊत यांनी सांगितले.