
माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिवसेना शिवडी विधानसभेच्या वतीने रविवारी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या पुढाकाराने हा गुणगौरव सोहळा झाला. यावेळी दहावीच्या 50 गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब आणि बारावीतील 50 गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात आले. अन्य विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव सुधीर साळवी, उपनेत्या किशोरी पेडणेकर, आशिष चेंबुरकर, श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, किरण तावडे, भारती पेडणेकर, विजय भणगे, मनसेच्या नगरसेविका सुप्रिया दळवी, विधानसभा प्रमुख गौरी चौधरी, सुप्रित म्हात्रे पदाधिकारी उपस्थित होते. उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सामाजिक कार्य हाच शिवसेनेचा गाभा
संजय राऊत यांनी यावेळी अजय चौधरी यांच्या कामाचे कौतुक केले. ‘80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ हा मंत्र शिवसेनाप्रमुखांनी दिला होता. तोच शिवसेनेचा गाभा आहे आणि त्या सामाजिक कार्यावरच शिवसेना आज उभी आहे. नरेंद्र मोदी किंवा अमित शहा लॅपटॉप वाटत नाहीत. मुलांच्या भवितव्याचे हे काम फक्त शिवसेना करते, असे संजय राऊत म्हणाले. ‘आज आयएएस, आयपीएस या पदांवर मोठय़ा संख्येने यूपी-बिहारचे लोक दिसतात. ते जसे कष्ट करतात, तसे परिश्रम तुम्ही देखील घ्या. कुठलीही भीती बाळगू नका. जेन झी कशी क्रांती घडवतात हे आपण पाहिले आहे. ध्येय ठेवून चिकाटीने प्रयत्न केले तर तुम्हीही आयएएस, आयपीएस बनू शकता,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.


























































