
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक निशाणीचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असून याबाबत येत्या 12 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाने सुनावणीची पहिली तारीख निश्चित केली आहे.
मूळ शिवसेना आणि शिंदे गट अशा दोन्ही पक्षकारांना निवडणूक आयोगाने कागदपत्रे सादर करण्यासाठी आधी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत वाढवण्यात आली आहे.
पक्षाचे नाव आणि निशाणीबाबत अधिक पुरावे सादर करायचे असल्यास ते 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत, असे निवडणूक आयोगाने कळवले आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे दोन्ही गटांनी एकमेकांनाही उपलब्ध करून द्यावीत, असेही आयोगाने सांगितले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीपुरता होता आदेश
निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी अंतरिम आदेश देत शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच मूळ शिवसेना आणि शिंदे गटाला नवे पक्षनाव व निशाणी दिली होती. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपुरता हा आदेश लागू होता. आता अंधेरीची निवडणूक पार पडली असून त्याबरोबर आदेशही कालबाह्य झालेला आहे.