महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चाला परवानगी नाकारलीत तर महाराष्ट्रद्रोही ठराल, संजय राऊतांचा सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सुरु आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत आक्रमक झालेत. महाराष्ट्राचे उद्योग परराज्यात खेचून नेले जात आहेत. हा महाराष्ट्रवर खूप मोठा अन्याय आणि अत्याचार होत आहे. मात्र सरकार अजूनही गप्प बसलय. यामुळे आम्ही समस्त महाराष्ट्र प्रेमींना महाराष्ट्रासाठी मोर्चाला येण्याचे आवाहन केले आहे. जर हे सरकार महाराष्ट्र प्रेमींना मोर्चाला परवानगी देत नसेल तर राज्याच्या सत्तेवर महाराष्ट्र द्रोही सरकार बसलय असं म्हणावं लागेल. असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शनिवारच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाकडे आम्ही रीतसर परवानगी मागितली आहे. महाराष्ट्रात आणि देशात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यावर बंदी आली असेल तर सरकारने तसं जाहीर करावं. असा कोणता कायदा आणला आहे का? मागच्या किंवा पुढच्या दाराने आणीबाणी जाहीर केली आहे का? हा मोर्चा विरोधी पक्षाचा नसून तो महाराष्ट्रप्रेमींचा आहे. खरंतर सरकारमधल्या लोकांनी देखील आमच्या मोर्चात सामील व्हायला पाहिजे. त्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारली जाईल असं मला वाटत नाही कारण त्याचे परिणाम सरकारला सोसावे लागतील. मोर्चा जाहीर झालेला आहे आणि तो होईलच. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात अशाप्रकारे महाराष्ट्रप्रेमींचे मोर्चे निघाले होते. तशाच प्रकारचा हा मोर्चा आहे. असे राऊत म्हणाले.

सत्तेत घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे. मात्र आम्ही कोणतेही घटनाबाह्य काम करत नाही. लोकशाही पद्धतीने सत्तेवर बसलेलं सरकार लोकशाही पद्धतीला विरोध करत आहे. आम्ही लोकशाही मार्गाने पुढे चाललोय आणि त्याच मार्गाने तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू असे राऊत म्हणाले.

यावेळी भाजप नेत्यांचा समाचार घेताना ते म्हणाले की, भाजपच्या काही लोकांचे मेंदू हे किड्या मुंग्यांप्रमाणे आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? त्यांना आम्ही आमचे आहेत असं म्हटलंय. त्यात अपमान कुठे झाला? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 साली महू या ठिकाणी झाला. आता ते ठिकाण मध्यप्रदेशात असलं तरी तेव्हा मध्य प्रदेश राज्य नव्हतं. भाषिक राज्य केव्हा निर्माण झाली याचा त्यांनी अभ्यास करावा. त्यांना काही कळतं का? त्यांनी आधी या गोष्टींचा अभ्यास करावा.

बाबासाहेबांचा जन्म झाला त्यावेळेस देशात कोणतंही राज्य नव्हतं. मुंबई हा एकाच मोठा प्रांत होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे आहेत हे त्यांना कळत नसेल तर अजूनही त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी काय भावना आहेत हे दिसून येत आहे. या महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाला घटना दिली याचा आम्हाला अभिमान आहे. हा अभिमान त्यांना नाही. भाजप मध्ये काय लायकीची आणि कोणत्या बुद्धीची लोकं घेतलीत हे कळतंय. ते महापुरुषांचा अपमान करत आहेत. आणि आम्हाला अक्कल शिकवतात. बाबासाहेब या देशात जन्मले हे या देशाचं भाग्य आहे. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, हेत्याही पेक्षा मोठं भाग्य आहे. असे राऊत म्हणाले.

सत्तेत बसलेलं सरकार निर्लज्ज आहे. सरकारला महापुरुषांविषयी संवेदना नसतील तर हे सरकार लाचार आहे. महापुरुषांचा अपमान होऊनही गप्प बसणारे आमच्या विरोधात मात्र गांडूळासारखी वळवळ करत आहेत. म्हणूनच या सरकार विरोधात हा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. असे ते म्हणाले.

यावेळी मिंधे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत ते म्हणाले की, नाशिक मधील काही पदाधिकारी आधीच मिंधे गटात गेले होते. त्यातील 3 जणांची हकालपट्टी आम्ही आधीच केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून मिंधे गटात गेलेले लोक जमिनीचे व्यवहार करणारे दलाल आहेत. त्यांचे अवैध धंदे असल्याने त्यांच्यावर पोलिसांचा दबाव आणून त्यांना प्रवेश करायला लावत आहेत. या लालची लोकांना निष्ठा, श्रद्धा नाही. ज्यांचं सरकार येईल तिथे ते जात असतात. सरकार पडल्यानंतर 2024 ला हे सगळे झुंडीने आमच्या दारात उभे राहिलेले दिसतील, मात्र त्यांना आम्ही घेणार नाही.