
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी मुंबईसह राज्यभरात शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. मालाड पश्चिम येथे प्रज्ञा प्रबोधन शिवस्नेही संस्थेच्या वतीने माजी नगरसेवक अशोक पटेल आणि अनघा म्हात्रे यांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिकांना शाल, भगवद्गीता देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवसेना शाखा क्र. 215 आणि जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने ताडदेवमधील विद्यार्थ्यांना विविध वस्तू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेते-सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले होते. यावेळी युवासेना विस्तारक-विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर, चंद्रकांत गुंडये, रवी साटम उपस्थित होते. युवासेना युवती शिवडी विधानसभेच्या वतीने शिरोडकर हायस्कूलमधील विशेष विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपविभागप्रमुख पराग चव्हाण, युवासेना उपसचिव शार्दुल म्हाडगुत आदी उपस्थित होते.
अंधेरी पूर्व विधानसभा समन्वयक मनोहर पांचाळ, माजी नगरसेविका मनीषा पांचाळ आणि युवासेना विभाग अधिकारी मयूर पांचाळ यांच्या वतीने मोफत शिर्डी साईयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार ऋतुजा लटके उपविभागप्रमुख सत्यवान मंचेकर, अनिल खांडेकर, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राजा ठाणगे उपस्थित होते.
जे. जे. रुग्णालयामधील कर्मचारी रुग्णांची अहोरात्र सेवा करून थोडा वेळ मिळतो ते आपल्या कुटुंबाला देतात. त्यामध्ये लहान मुलांची शाळा व अभ्यास असल्याने त्यांना कुठलीच हौस मजा करता येत नाही. यंदा इमारतीमधील सर्व रहिवासी एकत्र येत बालदिन साजरा करण्याचे ठरविले. बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी नाच, गाणी, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बच्चे पंपनीसह पालकांनीही यात सहभाग घेतला. नारायण नवले, दिगंबर बिडवे, चंद्रकांत साळुंके, प्रशासकीय अधिकारी संतोष गोसावी, प्रमुख लिपिक अनिल दळवी, दिगंबर भुसारे व इमारतीमधील सर्व रहिवासी उपस्थित होते, अशी माहिती तृतीय श्रेणी संघटनेचे अध्यक्ष सुरेश तांबे यांनी दिली.

























































