जनतेची फसवणूक करणाऱ्या राज्यपालांवर खटलाच भरला पाहिजे! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका अत्यंत घृणास्पद होती. ‘मेरी मर्जी’ म्हणत राज्यपालांनी बेकायदा सरकार स्थापून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली असून त्यांच्यावर फसवणुकीचा खटला भरलाच पाहिजे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. राज्यपाल ही संस्था सत्ताधाऱ्यांकडून घरगड्याप्रमाणे वापरली जात असेल तर ती बरखास्त केली पाहिजे किंवा राज्यपालांच्या नियुक्तीसाठी नियमावली बनवली पाहिजे, असे मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ‘महाराष्ट्रात जो नंगानाच, बेबंदशाही सुरू आहे त्यामुळे देशाची आणि देशाच्या पंतप्रधानांचीही बदनामी होत असून ही बदनामी करणाऱयांना चाप लावा,’ असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.

उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि मिंधे गटावर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बेबंदशाहीवर परखडपणे भाष्य केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना करून ती प्राणापलीकडे जोपासली. त्या शिवसेनेला गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट आणि हिंदुत्वाच्या बुरख्याखाली दडलेला त्यांचा भेसूर, बीभत्स चेहरा न्यायालयाने गुरुवारी उघडा पाडला,’ असा घणाघात करताना उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद दिले.

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मिंधे सरकारची अवहेलना झाली आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेच नोंदवले. एवढे धिंडवडे निघाल्यानंतर या बेकायदेशीर सरकारने नैतिकतेला जागत राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे,’ असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. लोकशाहीत सर्वात शेवटचे न्यायालय हे जनतेचे आहे. त्यामुळे आता फैसला जनतेवर सोपवूयात, जनता देईल तो कौल आपण स्वीकारू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

….म्हणूनच मी राजीनामा दिला
‘सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आले असते. याचाच अर्थ असा की, आताचे अस्तित्वात आलेले सरकार बेकायदेशीर आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘ज्या लोकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मी सर्वकाही भरभरून दिलं, आपलं मानलं, विश्वास दाखवला त्या विश्वासघातक्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवावा हे मला कदापि चाललं नसतं. अशा विश्वासघातक्यांचं प्रमाणपत्र घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यात काडीचाही रस नव्हता. म्हणून आणि म्हणूनच मी माझ्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला. त्यावर मी अत्यंत समाधानी आणि ठाम आहे,’ असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

पोपट मेलाय… फक्त जाहीर व्हायचंय
उद्धव ठाकरे यांनी यावेळी न्यायालयाच्या निकालावर बोलताना मेलेल्या पोपटाचं उदाहरण देतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही निशाणा साधला. ‘काल न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवलाय, तो हलत नाही, निश्चल आहे, डोळे मिटलेले आहेत, चोच उघडत नाही, तो श्वासही घेत नाही वगैरे सांगून तो मेलाय हे जाहीर करण्याचं काम फक्त विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलंय. सध्याचे विधानसभा अध्यक्ष आधी आमच्याकडे होते. त्यानंतर राष्ट्रवादीत गेले. आता भाजपमध्ये आहेत. राजकीय प्रवास कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं,’ अशी मिश्कील टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यपाल, निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीची नियमावली बनवा
राज्यपाल ही संस्था सत्ताधाऱ्यांकडून घरगड्याप्रमाणे वापरली जात असेल तर ती बरखास्त केली पाहिजे किंवा राज्यपालांच्या नियुक्तीसाठी नियमावली बनवली पाहिजे, असे मतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. ‘स्वतःचे सरकार नसलेल्या राज्यांमध्ये आपल्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांना राज्यपाल बनवून उपद्व्याप केले जात असतील तर त्याला अर्थ नाही. नियमावली बनवली जाऊ शकत नसेल तर राज्यपाल पदच रद्द करावे, असेही ते म्हणाले. न्यायवृंदांप्रमाणेच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचीही एक प्रक्रिया असावी, त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांची निवड ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हेसुद्धा तपासणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारांनी आनंदोत्सव का साजरा केला, कळलेले नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जल्लोष करणाऱ्या मिंधे गटाचा समाचारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला. ‘भाजपने आनंद व्यक्त केला असता तर समजू शकतो. डोईजड झालेले ओझे उतरवण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दिला म्हणून त्यांनी आनंद साजरा केला असं म्हणता येईल. मात्र गद्दारांनी आनंदोत्सव का साजरा केला, फटाके का फोडले? हे कळलेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. असं म्हणतात की, गद्दारांना रेडा वगैरे माहीत आहे, त्याचा बळी देण्यापूर्वी त्याला हारतुरे घातले जातात, पूजा केली जाते. त्यामुळे फटाके पह्डले असतील तर माहीत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

> संपूर्ण जगात महाराष्ट्राची अवहेलना चालली आहे. महाराष्ट्र म्हणजे शूरांचा, वीरांचा असे वर्णन इतिहासात आहे. त्या वर्णनाला साजेसे वर्तन सध्याच्या सत्तापिपासूंकडून दिसत नाही. महाराष्ट्राची ही बदनामी थांबलीच पाहिजे.
> सर्वोच्च न्यायालयाने जो गटनेता बेकायदा ठरवला तो राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
> काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने आमच्या नैतिकतेवर बोलणाऱयांनी नितीशकुमार सरकार का तोडले, मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याबरोबर सत्तेचा पाट का मांडला? याचे उत्तर द्यावे.

विधानसभा अध्यक्षांनी काही उलटसुलट केलं तर पुन्हा न्यायालयात जाऊ
‘सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतील. त्यांना तो घ्यावाच लागेल, पण तो घेताना त्यांनी काही उलटसुलट, वेडेवाकडे केले तर निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो तसेच अध्यक्षांविरोधात न्यायालयात जाऊ. त्यानंतर बदनामी झाली तर तुम्हाला जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत, त्यांनी लवकरात लवकर परत यावं आणि न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय द्यावा, असे ते म्हणाले.

मिंध्यांची गाडी आता उतारावरून घसरायला लागलीय. त्यांचा कारभार उतरणीला लागलाय. डबल इंजिनामधील आता पोकळ इंजिन बाजूला काढून आरेमध्ये नाहीतर कांजूरच्या कारशेडमध्ये दुरुस्तीला पाठवावे लागेल.