पर्यावरण रक्षणासोबतच आप्तेष्टांच्या स्मृती जपण्याचा संदेश देणारा ‘बाप्पाचं झाड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या अंगणातील मातीतून आपल्याच हाताने लाडक्या श्री गणरायाची मूर्ती साकारा. त्यात आवडत्या रोपाची बी टाका. मूर्तीचे विसर्जन घरीच कुंडीत करून त्यातून उगवणारे रोप आपल्या जग सोडून गेलेल्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने जपा. सदैव त्यांच्या स्मृतींचे जतन करा, असा काळजाला भिडणारा संदेश देणारा ‘बाप्पाचं झाड’ हा लघुपट सध्या सर्वांचीच मने जिंकतोय.

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्तींविषयी प्रबोधन करणाऱया नाशिकच्या मिट्टी फाऊंडेशनने हा लघुपट तयार केला असून, अल्पावधीत हजारो गणेशभक्तांची त्याला पसंती मिळाली आहे. पर्यावरणपूरक आणि मनमोहक गणेश मूर्ता साकारणाऱया मूर्तीकार कुटुंबातील मयूर मोरे यांचे मिट्टी फाऊंडेशन आहे. ‘अंगणातील माती’ ही संकल्पना ते राबवत असून यावर्षी नाशिककरांना घरच्या घरी मूर्ती तयार करण्यासाठी त्यांनी ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर 25 हजार पिशव्या माती उपलब्ध करून दिली.

त्यांच्याप्रमाणेच पर्यावरण रक्षणासाठी, गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी नमामी गोदा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित कार्यरत आहेत. एकच विचार रुजवणारे हे दोन फाऊंडेशन एकत्र आले आणि मोरे यांचा ‘बाप्पाचं झाड’ हा सुंदर लघुपट तयार झाला. विशेष म्हणजे अनेकांनी या लघुपटाचे स्वागत करीत असे झाड जपण्याचे पाऊल उचलले आहे.

या लघुपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, राजेश पंडित, अभिलाक्ष सूर्यवंशी यांनी भूमिका साकारल्या आहेत. निर्माते मयूर मोरे व चिन्मय उदगीरकर असून लेखन, गीत संतोष प्रभुणे यांचे आहे. निर्माते प्रतीक शर्मा आहेत, तर संगीत आनंद ओक यांचे असून गायन डॉ. श्वेता पेंडसे यांनी केले आहे.

विसर्जित मूर्तीमधून फुटतो ‘बाप्पाच्या झाडा’चा अंकुर

घरातील लहान-मोठय़ांनी एकत्र येत मूर्ती घडवावी, त्यात आवडत्या रोपटय़ाचे बी टाकावे. यातून सृजनाचा आनंद घ्यावा. कोरोना काळात अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली, त्यांच्या स्मृती या रोपटय़ाच्या रूपात जतन कराव्यात, असे सांगणारा हा लघुपट आहे. मनोभावे गणेशोत्सव साजरा केल्यानंतर विसर्जन केलेल्या मूर्तीतील बीमधून उगवणारे झाड म्हणजेच बाप्पाचं झाड.