श्री येमाई देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात; हनुमान जन्मोत्सव आनंदात साजरा

महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणारे शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील जागृत देवस्थान, तीर्थक्षेत्र श्री यमाई देवीचा चैत्र पौर्णिमेस होणारा यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. भाविकांनी हनुमान जन्मोत्सव व श्री येमाई देवीच्या पालखी सोहळ्यास गर्दी केली होती. सध्या तालुक्यातील विविध गावोगावच्या यात्रा, जत्रा धुमधडाक्यात सुरु आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात छोट्या,मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे. श्री हनुमान जन्मोत्सव कवठे येमाई गावठाणातील ऐतिहासिक हनुमान मंदिरात उत्साहात साजारा करण्यात आला. यावेळी भजन आयोजित करण्यात आले होते.

ग्रामदैवत श्री येमाई देवीचा पालखी सोहळा सकाळी 8 वाजता मोठ्या जल्लोषात सुरु झाला. देवीच्या पालखीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पालखीसमोर आकर्षक झांज पथक वाद्यघोष आयोजित करण्यात आले होते. गावातील कलाकार पारंपारिक सनई, संबळ, ताशा, डफ यासह पालखीत सहभागी झाले होते. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच दीपक रत्नपारखी व सहकाऱ्यांनी यांनी पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांसाठी थंडगार मट्ठा उपलब्ध केला होता. गावापासून 3 किमी अंतरावर श्री येमाई देवीचे भव्य मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेस राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती, तमाशा व कुस्त्यांचा जंगी आखाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती गावच्या सरपंच शोभा किसान हिलाळ, यात्रा कमेटी व ग्रामस्थांनी दिली. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे व यात्रा उत्साहात पार पडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.