
दादर येथील शुश्रूषा रुग्णालयातील कामगारांचे दोन दिवसीय आंदोलन आजपासून सुरू झाले. कामगारांनी काम बंद ठेवून रुग्णालयाच्या गेटबाहेर जोरदार निदर्शने केली. रुग्णालयाला चांगले उत्पन्न असतानाही कोरोनाचे निमित्त सांगून व्यवस्थापनाकडून कामगारांचा पगार कापला जात आहे. यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबई लेबर युनियनच्या अखत्यारितील शुश्रूषा सिटिझन्स को. ऑप. हॉस्पिटल कामगार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. त्यामध्ये जवळपास 400 कर्मचारी सहभागी झाले असल्याचा दावा संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर साळवी यांनी केला. कामगार आणि त्यांच्या पुटुंबीयांना आजारी पडल्यास रुग्णालयात दाखल करून घेणार परंतु त्यांना लागणाऱया औषधांचा खर्च मात्र केला जाणार नाही ही व्यवस्थापनाची भूमिका भावनाशून्य असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कोरोना काळात या कामगारांबद्दल असा विचार करणे योग्य आहे का असा कामगारांचा सवाल आहे.




























































