
गेल्या काही दिवसांपासून सोनेचांदीच्या दरात चढउतार होत असून त्यात अस्थिरता आहे. गेल्या आठवड्यात सोनेचांदीचे दर घसरले होते. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनेचांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. अमेरिका इराणमध्ये शांतता करार होण्याची शक्यता आणि कच्च्या तेलाचे दर घसरत असल्याचे सोनेचांदीच्या दरात वाढ झाली आहे.
वायदे बाजारात (MCX) सोमेवारी सोन्याचे दर ०.४०% किंवा ७२७ ने वाढून प्रति १० ग्रॅम १,५९,३१५ झाले. तर चांदीचे दर १.६०% किंवा ४,५९२ प्रति किलोने वाढून प्रति किलो २,७६,१९२ झाले. डॉलरच्या घसरणीमुळे आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होण्याची आशा वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या.
डॉलर निर्देशांक सुमारे ०.३०% ने घसरला. यामुळे डॉलरमध्ये व्यवहार होणाऱ्या सोन्या-चांदीचे दर इतर चलनांच्या तुलनेत स्वस्त झाले.कच्च्या तेलाच्या किमती ५% पेक्षा जास्त घसरल्या. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $९८ च्या खाली घसरले. वृत्तानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात लवकरच शांतता करार होऊ शकतो.
कमकुवत डॉलर आणि ट्रेझरी यील्ड्समधील मंदीमुळे सोन्याला आधार मिळाला आहे. होर्मुझमधील तणाव कमी होण्याच्या आशेने बाजारात सुधारणा झाली. तथापि, करार लवकरच होणार नाही असे ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर, बाजारात अस्थिरता कायम आहे. सध्या, सर्व महत्त्वाच्या ईएमएच्या (EMAs) वर किमती व्यवहार करत असल्याने तेजीचा कल कायम आहे. सोन्यासाठी प्रतिकार पातळी ₹१,६०,००० असून त्यानंतर ₹१,६३,००० आहे. आधार पातळी ₹१,५७,५०० आहे. या पातळीच्या खाली घसरण झाल्यास भाव ₹१,५४,००० पर्यंत खाली येऊ शकतात.



























































