शीव पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 500 टनाचा गर्डर बसवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे मार्गावरील शीव पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 500 टन वजनाचा ‘सेमी-थ्रू’ स्टील गर्डर बसवण्यात मध्य रेल्वे प्रशासनाने यश मिळवले. मध्य रेल्वेने माटुंगा आणि कुर्लादरम्यान घेतलेल्या रात्रकालीन ब्लॉकदरम्यान ही कामगिरी केली. त्यामुळे शीव रेल्वे ओव्हर ब्रिजचा बहुप्रतीक्षित प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत शीव पुलाच्या पुनर्बांधणी कामाला गती देण्यात आली आहे. तात्पुरते आधारस्तंभ उभारणे, गर्डर बसवण्याची व्यवस्था करणे आणि रचना-स्थिती तपासणे ही पूर्वतयारी करून शीव पुलाच्या पुनर्बांधणीसाठी गर्डर बसवण्याचे काम फत्ते करण्यात आले. कार्यरत रेल्वे मार्गांवरून 500 टन वजनाचा स्टील गर्डर बसवणे ही मोठी अभियांत्रिकी कामगिरी मानली जात आहे.