
रेल्वे स्थानकांसह एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने आता एक्सप्रेस ट्रेननंतर उपनगरीय मार्गावर धावणाऱया सर्व लोकल गाडय़ांच्या डब्यात स्मोक डिटेक्शन यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एखाद्या डब्यात आग लागल्याची घटना घडल्यास त्याचा तत्काळ अलर्ट मोटरमनसह पंट्रोल रूमला जाणार आहे. परिणामी तत्काळ गाडी थांबवून मोठा अनर्थ टाळणे शक्य होणार आहे.
मध्य रेल्वेकडून उपनगरीय मार्गावर दररोज 1820 फेऱया चालवल्या जात असून त्यामधून सुमारे 45 लाख चाकरमानी प्रवाशी मोठय़ा दाटीवाटीने प्रवास करतात. सध्या रेल्वेच्या मुंबई विभागात स्थानक, लोकल ट्रेनसह फलाटावर दररोज सरासरी चार-पाच आगी लागतात. आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आपल्या एक्सप्रेस ट्रेनच्या 837 डब्यांमध्ये स्मोक डिटेक्शन यंत्रणा लावली असून मार्चअखेरपर्यंत उर्वरित 372 डब्यांमध्ये सदरची यंत्रणा लावली जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे सुरू असलेले काम संपल्यानंतर मार्चनंतर लोकल ट्रेनच्या सुमारे 1872 डब्यांमध्ये सदरची यंत्रणा लावण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे दाटीवाटीने प्रवास करणाऱया लोकल प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होऊ शकणार आहे.
माल डबा ज्येष्ठांसाठी राखीव करण्याचा विचार
लोकल ट्रेनमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यांना गर्दीत चढता न आल्याने अनेकदा गाडी सोडावी लागते. त्याची दखल घेत लोकल ट्रेनमध्ये असलेला माल डबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवता येईल का याबाबत मध्य रेल्वेकडून विचार सुरू आहे. मात्र त्यावर अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेतला जाणार आहे.
प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटन लावणार
रेल्वे स्थानकात काही अनुचित प्रकार घडत असले तर त्याकडे सुरक्षा यंत्रणेचे तत्काळ लक्ष वेधता यावे म्हणून रेल्वेकडून आपल्या 117 स्थानकांतील प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बसवण्यात येणार आहेत. सदर बटनाचा प्रवाशाने वापर केल्यास तत्काळ त्याचा मेसेज स्थानकातील सुरक्षा यंत्रणा, मुख्य नियंत्रण कक्षाला जाणार आहे. त्यामुळे अनुचित प्रकार सहजपणे टाळता किंवा दोषीला तत्काळ ताब्यात घेता येणार आहे.



























































