
>> दिलीप देशपांडे
सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे तसा जाहिरातींचाही आहे. जो तो आपला उत्पादित माल बाजारपेठेत कसा जास्त विक्री होईल या प्रयत्नात असतो.
‘कस्टमर इज किंग’ किंवा ‘कस्टमर इज गॉड’ अशी विशेषणं ग्राहकाला लावली जातात आणि दुसरीकडे अनेक प्रलोभनं दाखवून ग्राहकांना आपल्या मालाच्या, वस्तूंच्या खपासाठी आकर्षित केले जाते. बऱयाचदा अशा प्रलोभनांना ग्राहक बळी पडतो. त्यातच त्याची फसवणूक केली जाते. बाय वन गेट वन, तर कधी विशिष्ट रकमेचा माल खरेदी केला तर कुपन मिळेल, त्याची सोडत निघणार. सोनेखरेदीवर चांदीचे नाणे किंवा गिफ्ट, फ्लॅट खरेदीवर टू व्हीलर अशा जाहिराती मोठय़ा प्रमाणावर केल्या जातात आणि त्यालाच आपण भुलतो आणि फसवणूक होते.
ग्राहक दिन साजरा करण्यामागचा उद्देश बघितला तर तो ग्राहकाची फसवणूक होऊ नये, सेवा पुरवताना हलगर्जीपणा होऊ नये म्हणून ग्राहकाला ग्राहक कायद्यांची माहिती करून द्यावी हाच आहे. 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. अध्यक्ष केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले, जागतिक पातळीवर पाठपुरावा केला गेला. त्याला युनेस्कोकडून मान्यता मिळाली आणि तद्नंतर दरवर्षी 15 मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. सर्वत्र तो साजरा केला जातो. आपल्या देशात 1986 मध्ये राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याला मंजुरी दिली तेव्हापासून ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकास सहा प्रकारचे हक्क प्राप्त झाले आहेत.
1) सुरक्षेचा हक्क – एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकांनी घेणे आवश्यक असते. जसे फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मोटर बाईक, कार
2) माहितीचा हक्क – आपण खरेदी करत असलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल माहिती विक्रेत्याने ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. त्यात फसवणूक करू नये.
3) निवडीचा हक्क – विक्रेता उत्पादन वा ब्रॅण्डचा आग्रह करू शकत नाही. निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे.
4) तक्रार करण्याचा तसेच त्याच्या निवारणासाठीचा हक्क – फसवणूक झाली असेल तर न्यायासाठी तक्रार निवारण करून घेण्यासाठी ग्राहक मंच, ग्राहक परिषदेत जाण्याचा हक्क आहे.
5) ग्राहकांच्या हक्कांविषयी शिक्षणाचा अधिकार – ग्राहकांना हक्क, कर्तव्ये माहीत नसल्यामुळे बाजारपेठेत फसवणूक होते. ते समजण्यासाठी स्वयंसेवी संस्था, शासनाकडून ‘जागो ग्राहक जागो’सारख्या उपक्रमांद्वारे प्रबोधन केले जाते.
ग्राहकांची फसवणूक झाली असेल तर त्याला न्याय हा मिळतोच, पण आपल्या हक्कांसोबतच काही कर्तव्ये आहेत याची जाणीवसुद्धा ग्राहकांनी ठेवायला हवी. ग्राहकांना योग्य तो न्याय मिळावा म्हणून जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंच कार्यरत आहेत. विनाशुल्क आपण तक्रार दाखल करू शकतो. राज्य पातळीवर राज्य ग्राहक परिषद आहे, तर केंद्रात राष्ट्रीय परिषद आहे.
गावपातळीवर ग्राहकांसाठी ग्राहक सेवा संस्था, ग्राहक पंचायत, प्रवासी संघ कार्यान्वित आहेत. ग्राहकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्या कार्य करतात. प्रत्येक जिह्यात जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समिती आहे. काही वर्षांपासून शासनात ग्राहक संरक्षण विभागाची निर्मिती केली आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे मंत्र्याची नेमणूक आहे. शहरी, ग्रामीण भागात ग्राहकाच्या हक्काचे रक्षण होणे, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्था असली तरी ग्राहकास खूप काळ न्यायासाठी ताटकळत बसावे लागते. अनेक ठिकाणी जिल्हा ग्राहक मंचावर अध्यक्ष नसतात. हे शासनाचे दुर्लक्षच म्हणावे लागेल.
ग्राहकांच्या वाढत्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने ‘जागो ग्राहक जागो’ अभियान सुरू केले आहे. बँका, सार्वजनिक वितरण, वीज, बांधकाम, अन्न व औषधे, पर्यटन, पोस्ट अशा विविध प्रकारच्या खात्यांच्या तक्रारी या अभियानाच्या हेल्पलाइनवर ग्राहक करू शकतो. जागतिक ग्राहक दिन, राष्ट्रीय ग्राहक दिनाचे शासकीय पातळीवरून आयोजन केले जाते. त्यात औपचारिकता असते. काहीच ठिकाणचे अपवाद सोडले तर बहुतांशी उदासीनता असते. कार्यक्रमास ग्राहकांच्या उपस्थितीचा अभाव असतो. ज्या आत्मीयतेने आयोजन अपेक्षित आहे ते केले जात नाही.
वास्तविक अशा कार्यक्रमात, वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी, गॅस एजन्सी, वजनमापांबाबत अधिकारी उपस्थिती हवी. ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायदा समजवून सांगायला हवा, ते होत नाही. कार्यक्रमात ग्राहकांची उपस्थिती वाढण्यासाठी प्रयत्न होत नाही. शासनाने याबाबतीत योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे हे मात्र नक्कीच.
शेवटी एकच म्हणावे लागेल. कायद्याने ग्राहकांना हक्क, अधिकार दिले आहेत. ग्राहक म्हणून त्याचा कसा वापर करायचा ते आपणच ठरवायचे आहे. न्याय मिळवण्यासाठी न घाबरता तक्रार करायलाच हवी. ग्राहकाने त्यास दिलेल्या हक्काचा योग्य वापर करून, आपली कर्तव्ये लक्षात ठेवून, बाजारपेठेत जागृत राहून खरेदी करणेही अपेक्षित आहे, जेणेकरून तो फसवणुकीतून वाचू शकेल.
कर्तव्ये आणि जबाबदारी
बाजारपेठेत एका उत्पादनासाठी अनेक उत्पादक असतात. त्यात स्पर्धा ही असणारच. फसव्या जाहिरातीला ग्राहकाने बळी पडू नये.
बऱयाचदा धमाका सेल ऑनलाइन खरेदीवर असतात. सणावारालाही डिस्काऊंट सेल असतात. अशा वेळी न खपलेला किंवा काही दोष असलेला माल असू शकतो. सावधपणे खरेदी करावी.
खरेदी करताना मालाचे बिल आवश्यक आहे. बिलाचा आग्रह धरावा, न दिल्यास विक्रेत्याची तक्रार करावी. कारण माल दोषयुक्त असेल तर बिलाशिवाय आपण काहीच करू शकत नाही.
एमआरपीपेक्षा (मॅक्झिमम रिटेल प्राईज) जास्त किंमत देऊ नका. खरेदी करताना ती बघा.
वस्तूंची मुदत तपासा (एक्सपायरी डेट). ती संपली असेल तर वस्तू नाकारावी. अशा वस्तूचा वापर हानीकारक ठरू शकतो.



























































