इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय दर्जा अबाधित राहावा; सोलापूर मनपाच्या परवानगीला खेळाडूंचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘स्मार्ट सिटी’तून तब्बल 22 कोटी रुपयांचा खर्च करून इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यात आले. या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने व्हायला काही हरकत नाही, असा रिपोर्ट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकताच ‘बीसीसीआय’ला पाठवला. मात्र, केवळ पाच हजारांच्या वाढीव भाडय़ासाठी महापालिकेने लेदर बॉल सामन्यांच्या या मैदानावर टेनिस बॉल सामन्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मैदान सुस्थितीत राहावे, यासाठी टेनिस बॉल सामन्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर काही दिवसांपूर्वी महापौर चषक, कर्नल सी. के. नायडू व कुचबिहारी ट्रॉफीचे सामने खेळवले गेले आहेत. मैदानावरील खेळपट्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी उत्तम असल्याचा अहवाल माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्यासह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला पाठवला आहे. त्यातून सोलापूरकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे. आता 12 फेब्रुवारीला कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीचा अंतिम सामना पार्क स्टेडियमवर होईल, असे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने सांगितले.

दरम्यान, पार्क स्टेडियमवर यापुढे टेनिस बॉल सामने खेळायला परवानगी दिली जाऊ नये. मैदान अस्वच्छ होऊ नये, अशी मागणी जिल्हा क्रिकेट असोसिएशन, अम्पायर असोसिएशनने केली आहे. सचिव चंद्रकांत रेंबर्सु, संतोष बडके, सर्फराज सय्यद, मुश्ताक खैराटकर, नागेश राव, योगेश येमूल, मल्लेश याळगी, अक्षय हाकळे, राजेश येमूल, नागेश कल्याळ, सुनील मालप, प्रकाश भुतडा, रोहित जाधव, किशोर बोरामणी, सत्यजित जाधव, शिवा अकलूजकर आदींनी टेनिस बॉल सामन्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून आता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम अतिशय देखणे झाले असून, मैदानाची सीमारेषा, खेळपट्टय़ा, पॅव्हेलियन, बैठक व्यवस्था, खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम, राहण्याची सोय अतिशय उत्तम असल्याचा रिपोर्ट क्रिकेट नियामक मंडळाला गेला आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय सामने या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे मैदानाची स्वच्छता, देखभाल- दुरुस्ती वेळोवेळी व्हायला हवी, अशी अपेक्षा क्रिकेटपटूंनी महापालिकेकडे केली आहे.