
>> समीर गायकवाड
गड्डा यात्रा ही सोलापूरची ओळख आहे. मनोरंजनाची पुरेपूर हमी देणारी आनंदनगरी, खाद्यपदार्थांची रेलचेल, शेतीमालाचे देखणे प्रदर्शन ही नेहमीची वैशिष्टय़े. जानेवारीच्या मोसमात सिद्धेश्वर तलावाच्या पाण्यात सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचे देखणे प्रतिबिंब रात्र वाढेल तसतसे पसरत जाते अन् होम मैदानाकडे आलेली पावले समाधानी मनाने तृप्त होऊन घरी परततात हा इथला शिरस्ता पिढी-दरपिढी चालू आहे.
तथाकथित मोठय़ा शहरातले सृजन माझ्या सोलापूरला बऱ्याचदा नाके मुरडतात, काही जण तर सोलापूरला एक मोठ्ठं खेडं म्हणून हिणवतात! एका अर्थाने हा त्यांचा हा टोमणा बरोबरदेखील आहे. कारण यात्रा, जत्रा, उरूस हे आता मोठय़ा शहरांचे घटक राहिलेले नाहीत. उलट खेडय़ातूनदेखील ते हद्दपार होतील की काय अशी स्थिती झालीय. सोलापूरमध्ये मात्र एक यात्रा दरवर्षी साजरी होते, तीही तब्बल सातशे वर्षांपासून. अंगावर पट्टे ओढून मोहरमचे वाघ झालेले अन् पवित्र रोजे धरणारे हिंदू दिसतील. गड्डा यात्रेत मोठय़ा संख्येने सामील होणारे मुस्लिम बांधव दिसतील, चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांसोबत अन्य धर्मीयही नक्कीच भेटतील. अशा या मुलखावेगळ्या गावाची दरवर्षी भरणारी हौसेची – नवलाची यात्रा म्हणजे ‘गड्डा यात्रा’. सिद्धेश्वर महाराजांचा अड्ड (पालखी) यात्रा महोत्सव म्हणजेच गड्डा यात्रा!
आजच्या काळात नानाविध कारणांमुळे यात्रा-जत्रा साजऱया करण्याचं प्रमाण कमी होऊ लागले आहे, त्यामुळे यात्रा उत्सव साजरे करण्यात काय हशील आहे असं नव्या पिढीच्या काही शिलेदारांना वाटतं. ते योग्य की अयोग्य हे सांगण्याइतकं मोठंपण माझ्याकडे नाहीये. मात्र आमचे दहा लाख लोकवस्तीचे शहर म्हणा वा खेडं म्हणा, ते मात्र आमच्या दरसाली संक्रांतीत येणाऱया श्रीसिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेस तयार असतं. जग काय म्हणतंय याची फिकीर सोलापुरी माणूस कधी करत नाही. त्यामुळे कुणी किती नावे ठेवली तरी हा उत्सव परंपरागत उत्साहात साजरा होतोच आहे. अंगात पांढरीशुभ्र बाराबंदी घालून, धवलशुभ्र धोतर नेसून डोईला घेरदार मुंडासे बांधलेले भक्तगण अन् त्यांच्या भक्कम हातात अलगद विराजमान असलेले उत्तुंग देखणे नंदीध्वज जेव्हा 68 लिंगांना तैलाभिषेक करून प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्ताने शहरपरिक्रमाच पूर्ण करतात तेव्हा सगळे शहर त्या शुभ्र रंगात न्हाऊन निघते अन् भक्तीशक्तीचा हा सोहळा पुढे पुढे जात राहतो. ‘‘एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय’’ या जयघोषात शहर दुमदुमते. संमती कट्टय़ावरचे विधी असोत वा होमकुंडातले विधी वा वासराकडून केल्या जाणाऱया भाकणुकीचा कानोसा घेणं असो, ते विहंगम दृश्य आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी सारं शहर लोटलेले असते. या यात्रेचे गारुड काही औरच असते, इथला जल्लोष न्याराच असतो हे सगळे जणच मान्य करतात.
प्रत्येक खेडय़ाला जसे एक ग्रामदैवत असते तसेच सोलापूरलाही आहे. ते म्हणजे सात शतकांची भक्तिमय परंपरा असणारे शिवयोगी श्रीसिद्धरामेश्वर. श्रीसिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार या परिसरास सोन्नलगे असे संबोधले जायचे. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. यादव वंशापर्यंत सोलापूरचे संबोधन सोन्नलगी असे होते. मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके 1238 च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे संबोधले जाते. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर तर तिथल्याच दुसऱया एका भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असा आहे. सोनलपूर, सोलपूर ते सोलापूर असा हा नावाचा प्रवास आहे. सिद्धेश्वर महाराजांनी हे गाव वसवलेलं. सामाजिक सुधारणा करताना त्यांनी परिश्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्या काळी त्यांनी सामूहिक विवाह सोहळेही पार पाडले होते. जनतेचे पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे नष्ट करण्यासाठी सामूहिक श्रमातून त्यांनी तलावाची निर्मिती केली. विविध नद्यांतून पाणी आणून त्यांनी तलावात ओतले होते. सोन्नलगीच्या पंचक्रोशीत 68 लिंगांसह अष्टविनायक व अष्टभैरवांची प्रतिष्ठापना केली होती. ग्रामदैवताच्या या समृद्ध सामाजिक जाणिवांची साक्ष अजूनही ठळक आहे, देवस्थानाची सामाजिक कार्यांची महती दूरदूरवर विख्यात आहे अन् महत्त्वाचे म्हणजे जाती-धर्म, लिंग, प्रांत, वय, भाषा अशा कोणत्याही भेदात न अडकता सर्वसामान्य सोलापूरकरांशी या ग्रामदैवताची नाळ जुळलेली आहे.
गड्डा यात्रेचे प्रमुख 7 नंदीध्वज तसेच त्यांच्या सरावाचे 7 असे 14 अधिकृत आणि मान्यता दिलेले इतर नंदीध्वज हाती घेऊन सराव सुरू झाले की, यात्रा जवळ आल्याची चाहूल लागते. वर्षभर हे नंदीध्वज विशेष निगराणीत ठेवलेले असतात. योगदंडपूजनानंतर 13 जानेवारीस भोगीच्या दिवशी सिद्धेश्वर महाराजांची यात्रा यण्णीमज्जनाने सुरू होते. सकाळी हिरेहब्बू वाडय़ातून नंदीध्वज मार्गक्रमण करतात. ते दुपारच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरात येतात. त्यानंतर संमतीकट्टामार्गे शहरातील विविध भागांतून मल्लिकार्जुन मंदिरापर्यंतचा 13 किलोमीटरचा प्रवास दहा ते अकरा तासांत पूर्ण करतात. सातपैकी पहिला नंदीध्वज 28 फूट उंच आहे, त्यास जवळपास 10 फुटांपर्यंत लिंबू आणि खोबऱयाच्या वाटय़ा भक्तांकडून बांधल्या जातात. पहिला नंदीध्वज सिद्धेश्वर देवस्थानचा असून दुसरा कसब्यातील देशमुखांचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा आणि पाचवा विश्व ब्राह्मण समाजाचा, सहावा आणि सातवा मातंग समाजाच्या असतो. भक्त मोठय़ा एकाग्रतेने हे नंदीध्वज पेलतात. सिद्धेश्वर मंदिरातून 68 लिंगांच्या प्रदक्षिणेस निघालेली मिरवणूक रात्री उशिरा विसावते.
त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीस सिद्धेश्वर तलावानजीक असणाऱया संमती कट्टय़ावर अक्षता सोहळा साजरा होतो. उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाडय़ात पूजेचे मानकर यांच्या हस्ते पूजा होते. त्यानंतर अक्षता सोहळ्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने मार्गस्थ होतात. अग्रभागी असलेल्या पालखीचे आणि पाठोपाठ असलेल्या नंदीध्वजाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा प्रचंड गर्दी होते. बालपणी अनेकदा चेंगराचेंगरी सहन करत याचा आनंद घेतलेला आहे. हिरेहब्बू यांच्या घरापासून निघलेली मिरवणूक दाते गणपती, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा, सिद्धेश्वर प्रशालामार्गे दुपारी एकच्या सुमारास संमती कट्टय़ावर सातही नंदीध्वजासह येताच ‘‘सिद्धेश्वर महाराज की जय…’’चा घोष होतो. त्यानंतर योगदंडाच्या साक्षीने सुगडीपूजा आणि गंगापूजन करून बारा मडक्यामध्ये पाणी भरून त्यासमोर पानाचा विडा ठेवण्यात येतो. कुंभार घराण्यातील मानकर यांना हा विडा दिला जातो. संमतीला मडक्यातील पाणी, दूध, हळदकूंकू, तांदूळ अर्पण करून दिवटीने ओवाळले जाते, विधिवत पूजा होते. मानकर यांना संमती दिली जाते. त्यानंतर अक्षता सोहळ्यास प्रारंभ होतो. कन्नड भाषेतून संमती वाचन होते. पाचवेळा संमती वाचन केले जाते. प्रत्येक कडव्याच्या शेवटी ‘सत्यम…सत्यम’ असे उच्चारण होताच उपस्थित असणारे लाखो भाविक ‘सत्यम सत्यम’च्या घोषात अक्षता वर्षाव करतात. आठ ते दहा मिनिटांचा हा सोहळा असतो. यावेळी औट गोळ्याची आतषबाजी होते आणि तुतारी, नगाऱयाचा निनाद होतो. त्यानंतर नंदीध्वज अमृतलिंगाजवळ येतात. मानकऱयांना विडा दिला जातो.
होमविधीच्या दिवशी (संक्रांत) यात्रेतील पहिल्या नंदीध्वजाला नागफणा बांधण्यात येतो. त्यानंतर नागफणा नंदीध्वज मिरवणूक सायंकाळी काढली जाते. होम मैदानावर विधी होतात आणि गड्डा यात्रेस प्रारंभ होतो. हा नागफणा इतका वजनदार असतो की, दोन ते तीन माणसांनादेखील नंदीध्वज पेलवत नाही, परंतु सिद्धेश्वरांचे मानकरी, भक्त एकटय़ानेच प्रारंभापासून ते अखेरपर्यंत नागफणी बांधलेला नंदीध्वज घेऊन जातात. 16 जानेवारीस (किंक्रांत) रात्री आठ वाजता आबालवृद्धांचे आकर्षण असलेले शोभेचे दारूकाम होते. ही आतषबाजी पाहणे हा एक तृप्ती सोहळाच असतो. मिळेल त्या जागी लोक बसून घेतात आणि दीड ते दोन तास आकाशाला व्यापून टाकणाऱया दारूकामाचा आनंद घेतात. भोगी, संक्रांती आणि किंक्रांतीनंतर 17 जानेवारीला रात्री दहा-बाराच्या दरम्यान मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजांच्या वस्त्र विसर्जनाच्या (कप्पडकळी) कार्यक्रमाने यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.
होम मैदान अन् तिथे भरणारी ग्रामदैवताची गड्डा यात्रा ही सोलापूरची ओळख आहे. भलेमोठे वेगवेगळ्या आकारातले पाळणे, विविध मनोरंजनाची पुरेपूर हमी देणारी आनंदनगरी, विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणारी दुकाने, सौंदर्यप्रसाधनांपासून ते खेळण्यांपर्यंत अनेक वस्तूंची बाजारपेठ, शेतीमालाचे देखणे प्रदर्शन, हस्तकलांच्या सामग्रीची दुकाने अन् रसपानगृहे ही यात्रेतली नेहमीची वैशिष्टय़े असतात, पण तरीही ती इथल्या प्रत्येकास ओढ लावत राहतात. जानेवारीच्या थंडीच्या मोसमात सिद्धेश्वर तलावाच्या पाण्यात सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचे देखणे प्रतिबिंब रात्र वाढेल तसतसे पसरत जाते अन् होम मैदानाकडे आलेली पावले समाधानी मनाने तृप्त होऊन घरी परततात हा इथला शिरस्ता पिढी दरपिढी चालू आहे. लहानपणीच्या गड्डा यात्रेच्या आठवणी हा प्रत्येक सोलापुरी माणसाचा वीक पॉइंट असतो. यातच या यात्रेचे अन् या ग्रामदैवताच्या आस्थेचे यश सामावले आहे असं ओलेत्या डोळ्याने सांगताना मला वेगळाच अभिमान.
मागील वर्षी यात्रेच्या अनुषंगाने काही वाद झाले होते, पण त्यातून चांगलेच निष्पन्न झाले हे नक्की! यंदाही सुरक्षा आणि स्वच्छता यांवर कटाक्ष ठेवत नियोजन केले गेले आहे. प्रदूषण असो वा आरोग्य वा सुरक्षा, या सर्व बाबीवर दरवर्षी नव्याने धोरणे ठरत राहतील अन् जनहिताचेच निर्णय त्यातून होतील. मनात कपट न ठेवता वैरभाव एका स्मितहास्याने संपुष्टात आणणारा सगळा वीरशैव इथे सर्व लोकांत एकवटतो अन् यात्रा विनासंकट पार पडते असा आजवरचा अनुभव आहे. लाखो लोक एका मैदानावर येतात, जत्रेचा आनंद घेतात अन् कुठलाही अपघात वा घातपात न होता हा उत्सव आनंदात पार पडतो असंच आम्ही पिढय़ान्पिढय़ा अनुभवले आहे, पण नवनव्या कायद्यानुसार अन् नागरी सुविधांच्या सर्व आघाडय़ांवर त्यात बदल तो केलाच पाहिजे. संयोजक- आयोजक त्यास बांधील आहेत अन् राहतीलही. त्यानुसार निर्विघ्नपणे यात्रा पार पाडण्याची जबाबदारी सर्व सोलापूरकर नागरिकांचीदेखील आहे.


























































