सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रॉक्सिमिटी सेन्सर प्रणाली सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दिवसेंदिवस नवनव्या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. आता प्रॉक्सिमिटी सेन्सर प्रणालीची सुरुवात सोलापूर रेल्वे स्थानकाच्या पाचही प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. या सेन्सरमुळे जेव्हा रेल्वे येईल तेव्हा प्लॅटफॉर्मवरील 100 टक्के लाईट आपोआप लागतील. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून जाताच 70 टक्के लाईट आपोआप बंद होऊन 30 टक्के लाईट सुरू राहतील. सोलापूर रेल्वे स्थानकासह विभागातील मोठय़ा रेल्वे स्थानकांवर प्रॉक्सिमिटी सेन्सर लावण्यात आले आहेत.

सोलापूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जात असून, या माध्यमातून विजेची आणि पैशांची मोठय़ा प्रमाणात बचत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. सोलापूर विभागात विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विभागात बसविलेल्या या अत्याधुनिक सेन्सरमुळे वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत होत आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरील पाचही प्लॅटफॉर्मवर सेन्सर बसविण्यात आले आहेत. लहान स्थानकावर कर्मचारी काम करीत असल्याने विजेची बचत होत आहे.

सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकांवर सेन्सर बसविण्यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर विजेचा वापर होत असे. त्याचबरोबर मनुष्यबळही लागत असे. मात्र, मोठय़ा स्थानकावर सेन्सर लावल्यामुळे मनुष्यबळ कमी झाले आहे. यामुळे अत्याधुनिक प्रणालीमुळे मनुष्यबळ आणि विजेची मोठी बचत होण्यास मदत झाली आहे. विभागातील रोड साईड अर्थात लहान स्थानकांवर हे काम रेल्वे कर्मचारी करीत असल्याचेदेखील रेल्वे प्रशासनाने सांगितले.

स्वयंचलित सेन्सरमुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर यंत्रणा बसविण्यात आली आहे. विद्युत उपकरणे सतत सुरू राहात असल्याने लवकर खराब होत असे. मात्र, या सेन्सरमुळे प्लॅटफॉर्मवरील विद्युत उपकरणांचे आयुर्मान वाढले आहे. त्याचबरोबर वीजबिलाची मोठी बचत होण्यास मदत झाली आहे.
– अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय विद्युत इंजिनीअर.