
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड अभिनेता इरफान खान याला झालेल्या गंभीर आजाराच्या धक्क्यातून बॉलिवूड सावरत नाही तोपर्यंत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही कर्करोगाने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. सोनालीने स्वत: सोशल मीडियावरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 4, 2018
हम साथ साथ है, सरफरोश अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोनाली बेंद्रेला कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले आहे. ती सध्या न्यू यॉर्क येथे उपचार घेत आहे. तिने या आजाराविषयी व तिच्या अनुभवांविषयी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘कधीकधी, आयुष्य अनपेक्षित वळण घेते. मला हायग्रेड कर्करोगने ग्रासले आहे. एका छोट्या दुखण्यामुळे काही चाचण्या केल्या आणि त्याचे निदान हे असे अनपेक्षित आजारात झाले. निदान झाल्यानंतर माझे मित्रमंडळी, कुटुंबीय मला आधार देण्यासाठी आले आहेत. मी त्या सर्वांची आभारी आहे. यावर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे याशिवाय पर्याय नाही. माझ्यावर सध्या न्यू यॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. मी नेहमीच सकारात्मक विचार करते. त्यामुळे मी या कॅन्सरशी लढा देणारच. गेल्या काही दिवसात मला जे प्रेम आणि आधार मिळाला त्याने लढण्यासाठी बळ दिलं आहे. मी त्यासाठी सर्वांची आभारी आहे’, असे सोनालीने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, काही वर्षांपासून ती फार चित्रपट करत नव्हती. मात्र एक रिअॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’मध्ये सोनाली ही परीक्षक होती. मात्र अचानक वैयक्तिक कारणांमुळे तिने हा शो सोडला होता. त्यावेळी तिने शो सोडण्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र आता तिने शो सोडल्याचे कारण स्पष्ट झाले आहे.

























































