बागलाणमध्ये पेरण्या खोळंबल्या

29

सामना प्रतिनिधी । सटाणा

बागलाण तालुक्यात रोहिणी, मृग व आर्द्रा तिन्ही नक्षत्रांत मोठा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळवाफेवर बाजरी, भुईमुगाची पेरणी केली असली तरी उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे. बागलाण तालुक्यात केवळ 50 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जुलै महिना सुरू होऊन आठवडा झाला तरी पाऊस नसल्याने पेरण्या लांबल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. जमिनीची नांगरणी, वखरणी करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज असला तरी पाऊस रोजच हुलकावणी देत आहे.

गेल्या वर्षी मक्याला चांगला भाव मिळाल्याने या वर्षी बहुतांश शेतकरी मका पेरणी करण्यास उत्सुक आहेत, मात्र त्यासाठी जमिनीची ओल अधिक असावी लागते, परंतु तसा मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण्या करण्यावर मर्यादा पडत आहेत. गेल्या वर्षी पावसाने व शेतमालाच्या अल्प भावाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे, परंतु कर्ज काढून, उसनवार घेत शेतकरी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करीत आहे. मात्र पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या असल्याने शेतकऱ्यांचा धीर सुटू लागला आहे.

बागलाण तालुक्यातील जोरण, कपालेश्वर, किकवारी, विंचुरे, तळवाडे आदी परिसरांत पावसाळय़ातील जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने दोन दिवस हजेरी लावल्याने परिसरातील शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला. मात्र पावसाने दोन दिवस हजेरी लावूनही पेरणीसाठी ओल निर्माण झाली नाही. शेतकरीवर्गाने उन्हाळय़ात जमिनीची मशागत करून ठेवली व पावसाची प्रतीक्षा करीत राहिले. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पडलेल्या पावसामुळे शेतकरीवर्गाने मका, बाजरीचे बियाणे, खते लाखो रुपये खर्च करून घरात आणून ठेवले. मात्र वरुण राजाने बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टय़ात पाठ फिरवली आहे. लाखो रुपयांचे बियाणे, खत खाद्य घरातच तर पडून राहणार नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.

नाशिक जिह्यात त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी तालुक्यात पाऊस पडतो आहे. काही ठिकाणी नदीनाले दुथडी भरून वाहत आहे. मात्र बागलाण तालुक्यातील काही गावे पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने विहिरींनीही तळ गाठले. ऐन उन्हाळय़ात काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी नव्हते तर शेतीसाठी कसे येणार असे चित्र सध्या येथे दिसत आहे. शेतकरीवर्ग हा पूर्ण मेटाकुटीस आला आहे.

जोरण परिसरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गाची पेरणी ही महिन्याने लांबली आहे. पाऊस कधी पडणार व घेतलेले बियाणे आम्ही कधी शेतात पेरणार, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

बैलजोडीसह औताची मजुरी महागली
ज्यांच्याकडे बैलजोडी आहे, ते स्वतः शेतीची मशागत व पेरणी करण्यास प्राधान्य देत आहेत. भाडेतत्त्वावर औत मिळणेही महागडी बाब ठरत आहे. बैलजोडीसह औत याचे दिवसाला हजार रुपये मजुरी झाली असल्याने बैलजोडी नसणाऱयाला शेती करणे खर्चिक होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या