G20 summit 2023 – जी-20 परिषदेवर कोरोनाचे सावट, बायडेन यांच्यानंतर स्पेनचे राष्ट्राध्यक्ष झाले कोविड संक्रमित

राजधानी दिल्लीत शनिवार आणि रविवारी जी-20 देशांची शिखर परिषद (G20 summit 2023) होत आहे. मात्र या परिषदेवर कोरोनाचे सावट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या पत्नी झील बायडेन (Jill Biden) यानंतर आता स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेज (Pedro Sánchez) हे देखील कोविड संक्रमित झाले आहेत. त्यांनी स्वत: याबाबत पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेज यांनी गुरुवारी सायंकाळी ट्विटर अर्थात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ‘आज दुपारी माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या मला बरे वाटत आहे, मात्र जी-20 शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मी दिल्लीला जाऊ शकणार नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्राध्यक्ष नादिया कॅल्विनो आणि परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युअल अल्बारेस स्पेनचे प्रतिनिधित्व करतील, असे ट्विट सांचेज यांनी केले.

दरम्यान, जी-20 शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन रवाना झाले आहेत. आज सायंकाळी ते दिल्लीमध्ये उतरलील. त्यांची पत्नी झील बायडेन या देखील दिल्लीला येणार होत्या. मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी करण्यात आलेल्या कोविड चाचणीमध्ये त्या संक्रमित आढळल्या. त्यामुळे त्या जी-20 शिखर परिषदेमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

G20 परिषदेसाठी 4100 कोटी खर्च, पाहुण्यांसाठी सोने-चांदीचा मुलामा दिलेल्या भांडय़ांमध्ये जेवण

दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक

जी-20 शिखर परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. जगभरातील प्रमुख नेते दिल्लीत येणार असल्याने सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. दिल्लीचे रुपांतर अभेद्य किल्ल्यात करण्यात आले असून तब्बल 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच श्वान पथकांसह कमांडोज तैनात करण्यात आले असून परदेशी पाहुणे थांबणाऱ्या हॉटेलचा भाग नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. यासह केमिकल वेपन सह बायो वेपनविरोधात लढण्याचीही तयारी करण्यात आली आहे.