
स्पाईस जेटच्या विमानांतील तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच असल्याने नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) याची गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यात स्पाईस जेट सपशेल अपयशी ठरली आहे, असे स्पष्ट ताशेरे ओढत डीजीसीएने कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यानुसार स्पाईस जेटला सुरक्षेतील अपयशाबद्दल तीन आठवडय़ांत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
मागील 18 दिवसांत स्पाईस जेटच्या विमानांमध्ये आठव्यांदा तांत्रिक बिघाड झाला. या घटनांमुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने स्पाईस जेट डीजीसीएच्या रडारवर आली आहे. डीजीसीएने कठोर भूमिका घेत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. स्पाईस जेट कंपनी विमान नियम – 1937 अंतर्गत सुरक्षित, दक्ष आणि विश्वासार्ह हवाई सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. अंतर्गत सुरक्षा तपासणी व विमान देखभालीची बोंब आहे. स्पेअर्स पुरवठादारांना वेळेवर पैसे न दिल्यामुळे स्पेअर्सचीही वानवा आहे, असे ताशेरे डीजीसीएने ओढले आहेत. तसेच विमानांची देखभाल का केली नाही? सुरक्षेबाबत एवढा निष्काळजीपणा का? असे विविध प्रश्न उपस्थित करीत डीजीसीएने स्पाईस जेटकडून तीन आठवडय़ांत स्पष्टीकरण मागितले आहे.
शेअर 7 टक्क्यांनी घसरला
बुधवारी या कंपनीचा शेअर 7 टक्क्यांनी घसरून 35 रुपयांच्या पातळीवर खाली आला. मागील वर्षभरातील कंपनीच्या शेअर्सची ही नीचांकी पातळी ठरली. कंपनीचे शेअर्स वर्षभरात 50 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
रडार बंद पडल्याने चीनला जाणारे विमान भरकटले
मंगळवारी कोलकात्याहून चीनच्या चोंग्किंग शहरात जाणाऱया विमानाचे हवामानासंबंधीत रडार टेकऑफनंतर काही मिनिटांतच बंद पडले. त्यामुळे ते विमानही भरकटले. संभाव्य अपघात रोखण्यासाठी ते विमान कोलकात्यात माघारी फिरले. मंगळवारी दिवसभरातील तांत्रिक बिघाडाची ही तिसरी घटना ठरली.

























































