एसटी संप संपेना, कामगार ठाम! आंदोलनात भाजपची घुसखोरी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱयांचा संप 15 दिवस झाले तरी संपता संपत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. आज काही कर्मचाऱयांनी कामावर परतण्याचा प्रयत्न केला. परंतु अन्य आगारातील कर्मचाऱयांना त्याची कुणकूण लागताच ते तातडीने तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या कर्मचाऱयांच्या तोंडाला काळे फासले. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची शपथही घेतली. माघार घेणार नाही अशा निर्धाराने कर्मचाऱयांनी आंदोलन सुरूच ठेवले असले तरी दुसरीकडे एसटी महामंडळाचा कारवाईचा बडगाही सुरू आहे. आज आणखी 1135 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले. निलंबनाची कारवाई झालेल्या कर्मचाऱयांची संख्या आता 2053 झाली आहे. या आंदोलनात आता भाजपची घुसखोरी झाली असून ते आंदोलन भडकवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत.

एसटी कर्मचाऱयांचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱयांनी 27 ऑक्टोबरपासून आंदोलन छेडले आहे. आधी शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता व उर्वरित मागण्यांवर दिवाळीनंतर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर संप मागे घेतला जाईल अशी अपेक्षा होती; परंतु कर्मचाऱयांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेत मागणी मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसटी कर्मचाऱयांच्या मागण्यांसाठी सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. मात्र संप मागे घेण्याच्या अनेक विनवण्या करूनही कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांनी आझाद मैदानात कालपासून ठिय्या मांडला आहे. त्यांना चिथावण्यासाठी भाजपा नेते आणि कार्यकर्तेही त्या आंदोलनात घुसले आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी रात्री आझाद मैदानात कामगारांसोबत जेवण केले. त्यानंतर त्यांनी तिथेच मुक्काम केला. रात्री आंदोलनासाठी कर्मचारी थांबत नसल्याने ठाणे, पालघर अशा नजीकच्या आगारातील कर्मचाऱयांनी रात्रपाळी करावी असे आदेश संपकरी एसटी कर्मचाऱयांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत होते.

सदाभाऊंनी बाहेर येऊन वेगळेच सांगितले…’

एसटी कामगारांच्या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चाही केली. परंतु सदाभाऊ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन कर्मचाऱयांना वेगळेच सांगितले असे अनिल परब यांनी म्हटले आहे. परब म्हणाले, ‘मी वारंवार आवाहन करीत आहे की, नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संप मागे घ्या. तुमच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. विलीनीकरणाचा निर्णय दोन-चार दिवसांत घेण्यासारखा नाही. त्यामुळे आपण चर्चा करून मार्ग काढू या. मी काल सदाभाऊ खोतांशी चर्चा केली. त्यांना सगळं समजावून सांगितले. परंतु त्यांनी बाहेर येऊन वेगळेच सांगितले.’ असे अनिल परब म्हणाले. दरम्यान, एस. टी. कर्मचाऱयांच्या एका शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

सांगलीत कर्मचाऱयाचे हृदयविकाराने निधन

आंदोलन सुरू असतानाच आज सांगली जिह्यात एका एसटी कर्मचाऱयाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. राजेंद्र निवृत्ती पाटील (46) असे या कर्मचाऱयाचे नाव आहे. ते सांगली आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी आपल्या मूळ गावी कवलापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

शिवशाही बसेसवर दगडफेक

नाशिक ः एसटीच्या संपात प्रवाशांचे हाल थांबविण्यासाठी खासगी शिवशाही बसेस चालविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या बसेस ठक्कर बाजार बस स्थानकातून पोलीस बंदोबस्तात पुणे आणि धुळे मार्गावर मार्गस्थ झाल्या होत्या. मात्र, महामार्ग बस स्थानकावर पोलीस नसल्याने अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना काल सायंकाळी घडली.

संपाचे ठाण्यात पडसाद

n खोपट डेपोतील विश्रांतीगृहात बसलेल्या आंदोलकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
n पालघर विभागातील 57 कर्मचारी निलंबित.
n प्रवाशांची रखडपट्टी थांबविण्यासाठी एनएमएमटीने सुमारे 37 जादा बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत.

आतापर्यंत 2053 कर्मचाऱयांचे निलंबन

न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संपकरी कर्मचाऱयांच्या विरोधात एसटी महामंडळाने कालच मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली असून त्यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. महामंडळाने बुधवारपर्यंत 918 कर्मचाऱयांना निलंबित केले होते. आज आणखी 1135 कर्मचाऱयांना निलंबित केल्याने एकूण निलंबित कर्मचाऱयांची संख्या आता 2053 इतकी झाली आहे. त्यात पुण्याचे 138, ठाणे 73, जळगाव 91, अकोला 66, बीड 67, मुंबई 64, रायगड 63, यवतमाळ 56, धुळे आणि नाशिकचे प्रत्येकी 54, सांगली 44, बुलढाणा 40 अशा 29 विभागांतील 122 आगारांतील 1135 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे.

कामावर परतणाऱया कर्मचाऱयांना मारहाण, सरकार संरक्षण देणार

बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सर्व आगारांमधील काम ठप्प आहे. तरीसुद्धा काही कर्मचारी कामावर पुन्हा परतण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु संपकरी कर्मचाऱयांकडून त्यांची अडवणूक होत आहे. वसई आगारात आज कर्मचाऱयांनी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याची माहिती नालासोपारा आगारातील संपकरी कर्मचाऱयांना मिळाली. त्यांनी तातडीने मिळेल त्या वाहनाने वसई आगार गाठले आणि वाहतूक सुरू करणाऱया कर्मचाऱयांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला.

संभाजीनगर आगार क्रमांक 2 मधील कर्मचाऱयांनी संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱयांवर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली. या दोन्ही घटनांनंतर संपापासून बाहेर असलेल्या कर्मचाऱयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यांना आगारामध्ये प्रवेश करणेही कठीण होऊन बसले आहे.

अशा घटनांची सरकारने दखल घेतली असून जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण पुरविण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली आहे. मात्र संरक्षण मिळाले तरी कामावर परतण्यास कर्मचारी तयार नाहीत, अशी बहुतांश आगारामधील स्थिती आहे.