
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत आज सत्ताधारी भाजपने 64 प्रस्तावांमधील तब्बल 25 प्रस्ताव विरोधकांना बोलू न देता मंजूर केले. सत्ताधाऱ्यांच्या मुजोरीविरोधात शिवसेनेसह सर्व विरोधकांनी निषेध करीत सभात्याग केला.
स्थायी समितीच्या बैठकीत, रस्त्यांवर खड्डे बुजविणे तसेच पावसाळय़ात पाणी निचरा करण्यासाठी पंप बसविणे, पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई, सफाई कर्मचाऱ्यांच्या घरासाठी राबविण्यात येणाऱया आश्रय योजनेच्या खर्चात फेरफार, रुग्णालयात लिफ्ट बसविणे, 17 प्रभाग समिती अध्यक्षांसाठी भाडे तत्त्वावर वाहने घेणे, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बूट आणि मोजे यांचा पुरवठा यांसारखे 64 प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. यातील सुमारे 31 प्रस्ताव होईपर्यंत अध्यक्षांनी विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली. मात्र त्यानंतर प्रभाकर शिंदे यांनी विरोधकांना बोलू न देता प्रस्ताव मंजूर केले. सत्ताधाऱयांच्या या मनमानीचा विरोधकांनी सभात्याग केला. शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे, श्रद्धा जाधव, रमाकांत रहाटे, दीपमाला बढे, मीनाक्षी पाटणकर, मनसेचे यशवंत किल्लेदार, काँग्रेसचे अश्रफ आझमी, जमीर कुरेशी आदींनी सत्ताधाऱयांचा निषेध केला.






























































