
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील क्रीडा संकुलाची अक्षरशः दुर्दशा झाली असून त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी नुकतीच युवासेनेच्यावतीने कुलगुरुंकडे करण्यात आली आहे.
युवासेनेचे पदाधिकारी तसेच माजी सिनेट सदस्यांनी नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील क्रीडा संकुलाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान तेथील छताची गळती अनेक महिन्यांपासून होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच जमिनीखाली पाण्याचा प्रवाह असल्यामुळे काही खेळांसाठी अत्यावश्यक विदेशातून आणलेल्या लाकडी फळ्यांचा कोबा (फ्लोरिंग) संपूर्णपणे उखडले असल्याचे आढळले. आता पावसाळा जवळपास संपला असून महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्या क्रीडा स्पर्धा सुरु होऊ शकतात. परंतु डागडुजी अभावी विद्यापीठाचे क्रीडा संकुलाचा वापर होऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने त्वरीत याकडे लक्ष देऊन तातडीने डागडुजी करण्याची मागणी युवासेनेचे प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, परमात्मा यादव, मयुर पांचाळ, अल्पेश भोईर आणि शीतल शेठ-देवरुखकर यांनी केली.
…त्या झोपडय़ांवर होणार कारवाई
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्यांनी कलिना कॅम्पस येथील हयात प्रवेशद्वारा शेजारील झोपडपट्टीची नुकतीच पाहणी केली. या झोपडयांमुळे विद्यापीठाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून त्या तातडीने निष्कासित करण्यात याव्यात, अशी मागणी युवासेनेने कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून या झोपडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश अभियंता, पायाभूत सुविधा नियोजन अंमलबजावणी व देखभाल विभाग यांना देण्यात आले आहेत. a





























































